सांगली : शिराळ्याचे जेष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांनी दोन वर्षासाठी आ. जयंत पाटील यांच्याशी केलेला घरोबा मोडीत काढून पुन्हा सत्तेच्या मांडवाखाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. वाळवा, शिराळ्यातील आमदार पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देउन राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे.
त्यांचा घरोबा प्रामुख्याने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी काल होता, आजही आहे, आणि उद्याही राहील अशीच राजकीय गणिते गेल्या आठवड्यात दिसून आली. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिराळा, वाळव्यात वाघ आणि नाग हा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा जिल्ह्याला पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. या निमित्ताने वाळव्यातील आमदार पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा हेतू असल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला या घटनेला महिना उलटला. मात्र, शिराळा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या वाळवा तालुक्यातील ४८ गावांवर प्रामुख्याने चालत आले आहे. या गावांवर आतापर्यंत आमदार पाटील म्हणतील तोच आमदार अशी भूमिका राहिली आहे.माजी आमदार नाईक यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व महायुतीच्या काळापासून केले. मात्र, या ४८ गावांच्या मतांवर आमदार पाटील यांनी त्यांना पराभूत केले.
झाले-गेले गंगेला मिळाले या न्यायाने अडचणीत आलेल्या नाईकांनी जमवून घेत भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षात दोन वर्ष्यापुर्वी प्रवेश केला. त्यावेळी हा पक्ष एकसंघ होता. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतरच्या काळात शिराळ्यात या पक्षाचा पराभव झाला. भाजपचे सत्यजित देशमुख हे विजयी झाले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वनवास नाईकांच्या नशिबी आला. यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा त्यांना सत्तेची सावली हवी होती. भाजपमध्ये जावे तर तिथे अगोदरच पाय ठेवायला जागा नाही अशी स्थिती. यामुळे जतचे विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची पायरी जवळ केली.
या सगळ्या राजकीय उलथापालथीमध्ये मानसिंगराव नाईक एकाकी झाल्याचे वाटत असले तरी तसे पडद्याआड मात्र वाटत नाही. कारण गेल्या आठवड्यात मानसिंगभाउंचा वाढदिवस होता. या निमित्ताने देण्यात आलेल्या शुभेच्छा जाहीरातीमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नावच नव्हे तर खा. पवार यांचेही छायाचित्र नव्हते. मात्र, आमदार पाटील यांच्यासोबत शिवाजीराव नाईक यांचे छायाचित्र आवर्जुन होते. यावरून वारे कोणत्या दिशेला आहे हे जाणकारांच्या लक्षात आले असावे.
मानसिंगराव नाईक सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. या पदाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतच त्यांची राजकीय वाटचाल दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चिखलीच्या नाईक घराण्याची युती कशी राहते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. दोघामध्ये छुपी युती असेल तर ते आमदार पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला पायबंद घालणारे ठरेल. उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी वाळव्यात निशीकांत पाटील, शिराळ्यात नाईक यांना ताकद दिली तर निश्चितच बालेकिल्ल्याच्या बुरूजाला तडे जाउ शकतात.