आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : भाजपाच्या आक्षेपानंतर उल्हासनगर महापालिकेतील शिंदेसेनेच्या स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेला उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिली… पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला… शिवसेना प्रकरणात आधी पक्षातील फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही, असा युक्तिवाद वकील नीरज किशन कौल यांनी केला… आमदार रोहित पवार यांनी पुणे शहर बंद पाडून दाखवावेच, असे खुले आव्हान पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले… ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकार यांच्या संगनमताने लोकशाही मूल्यांची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेसेनेच्या निर्णयाला न्यायालयाचा तडाखा
उल्हासनगर महानगरपालिकेतील राजकीय संघर्षाला कारणीभूत ठरलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा तडाखा दिला. या प्रक्रियेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावाचे राजपत्र प्रकाशित करण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्याची दिली आहे. त्यामुळे नगरविकास विभागाचे सचिव व पालिका आयुक्तांना या यासंदर्भातील प्रक्रिया करता येणार नाही. भाजपाच्या आक्षेपानंतर न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिंदेसेनेच्या या निर्णयाला मोठा तडाखा बसला आहे. तसेच नव्याने निवड झालेल्या सातही स्वीकृत नगरसेवकांच्या भवितव्यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेत सातत्याने वाद सुरू आहे. त्यामुळे आता शिंदेसेनेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जरांगे यांनी भेट दिली. सरकारने हा राजकीय विषय करू नये. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करा. जातीच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. आम्ही जातीचे राजकारण करण्यासाठी येथे आलेलो नाही. सरकारने विद्यार्थ्यांचे मन जिंकले पाहिजे. फडणवीस यांनी प्रवक्त्याची भूमिका न घेता विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे जरांगे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या धोरणांमुळे हातगाडीवाला, पाणीपुरीवाला, उद्योजक, नोकरदार बेजार झाला आहे. शेतात पाणी नाही, दुष्काळाची परिस्थिती आहे. येथे कोणीही सुखी नाही. सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. मोठा उठाव करण्याची वेळ आली आहे, असेही जरांगे म्हणाले.
शिंदेसेनेच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात १५ दिवसानंतर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिंदेसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच या प्रकरणात आधी पक्षातील फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही, असेही कौल यांनी न्यायालयात सांगितले. यावेळी त्यांनी कौल राणा आणि सुभाष देसाई या महत्त्वाच्या खटल्यांचा दाखला दिला. राणा खटल्याचा अर्थ चुकीचा लावला जात असल्याचा दावा त्यांनी केला. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच असतो, हे सुभाष देसाई खटल्यातील तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निकालाचा संदर्भ देऊन कौल यांनी सांगितले. व्हिप काढण्याचा अधिकार राजकीय पक्षाचाच असतो, यावरही त्यांनी भर दिला. आता या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे.
आमदार रोहित पवार यांना खुले आव्हान
आमदार रोहित पवार यांनी पुणे शहर बंद पाडून दाखवावेच, असे खुले आव्हान पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले. पुणे हे विद्येचे माहेरघर असून राज्यभरातून लाखो विद्यार्थी येथे करिअर घडवण्यासाठी येतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून कोणी शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल, तर पुणेकर ते खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेतून दिला. गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत पुण्यात आंदोलन करत आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे विवेक भीमनवार यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच राजीनामा न घेतल्यास पुणे शहर बंद पाडणार असा इशाराही रोहित यांनी दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी पुणे शहर बंद पाडून दाखवावेच, असे खुले आव्हान महापौर मंजुषा यांनी दिले आहे.
काँग्रेसकडून ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकार यांच्या संगनमताने लोकशाही मूल्यांची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, निवडणूक काळात अनेक गैरप्रकार घडून आले आहेत. ज्ञानेश कुमार हे लोकशाहीचीच फसवणूक करीत आहेत. ‘फॉर्म ६’ मधील बदल असतील किंवा चुकीच्या पद्धतीने राबवलेली एसआयआरची प्रक्रिया असेल, यात ते दोषी आढळलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील अशा प्रकारच्या बदलाला आम्ही मान्यता दिलेली नाही, अशी टिप्पणी केली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत केलेल्या टीकेला आता भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
