scorecardresearch

Premium

जमाखर्च : शंभूराज देसाई; कामापेक्षा वादच जास्त

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंत्री शंभूराजे देसाई कधी आपल्या बोलण्याने तर कधी आपल्या कार्यशैलीने वाद ओढवून घेणारे म्हणूनच अधिक प्रसिद्ध ठरले आहेत.

Shambhuraj Desai, Minister, Satara, Eknath Shinde, Shiv Sena, dispute
जमाखर्च : शंभूराज देसाई; कामापेक्षा वादच जास्त

विश्वास पवार

कोणाचाही कोणताही मुलाहिजा न ठेवता आपल्या मर्जीप्रमाणे दे धडक बेधडक, आक्रमक स्टाईलने काम करणारे साताऱ्याचे पालकमंत्री, पण स्वतःला ‘मालकमंत्री’ समजणारे, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंत्री शंभूराजे देसाई कधी आपल्या बोलण्याने तर कधी आपल्या कार्यशैलीने वाद ओढवून घेणारे म्हणूनच अधिक प्रसिद्ध ठरले आहेत.

Advani to Swaminathan BJP 4 points behind giving Bharat Ratna
अडवाणी ते स्वामिनाथन! ५ दिग्गजांना सर्वोच्च सन्मान; ‘भारतरत्न’ देण्यामागे भाजपाचे ४ मुद्दे; नेमकं राजकारण काय? वाचा…
Uday Samant about Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुन्हेगारांच्या छायाचित्रांबाबत उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत कोणी छायाचित्र काढल्यास…”
poverty
बहुविध दारिद्र्य म्हणजे काय? बहुविध दारिद्र्य निर्देशांक कसा ठरवला जातो?
Finance Minister Nirmala Sitharaman's blue sari in discussion; Why is 'Sari' a symbol of power for Indian women politicians!
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची निळी साडी चर्चेत; का आहे ‘साडी’ भारतीय महिला राजकारण्यांसाठी शक्तीचे प्रतीक?

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट पद मिळताच सुरुवातीचा उत्साह फारच चांगला होता. काहीतरी ठळक करून दाखवण्याची धमक ते व्यक्त करीत होते. पण कामापेक्षा वादच जास्त ओढवून घेतले. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंचे गोडवे गाणारे शंभूराज देसाई शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडात आमदार फोडण्यात अग्रभागी होते. आता ते एकनाथ शिंदे आणि सरकारची बाजू सांभाळताना वाद ओढवून घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते, पण आता महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यातच त्यांचा जास्त वेळ खर्च होतो.

हेही वाचा… जमाखर्च : अतुल सावे; ‘सहकार’ सोडून सारे काही!

तसे ते दोन जिल्ह्यांचे म्हणजे साताऱ्याचे पूर्ण आणि मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याचे नामधारी पालकमंत्री आहेत. मागील अनेक वर्ष मुख्यमंत्री ठाण्याचे पालकमंत्री होते. ते आता राज्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले आहे. आपल्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या जास्त जवळचे वाटणारे आपल्याला जड होतील असे वाटल्याने मुख्यमंत्र्यांनीच साताऱ्यात आणलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची काही महिन्यात तडकाफडकी बदली त्यांनी केली. त्यांच्यावर कुरघोडी करणाऱ्याचा ते बरोबर काटा काढतात. सर्वांसमोर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा उद्धार करण्याची वेगळी पद्धत त्यांच्याकडे आहे.

हेही वाचा… जमाखर्च : मंगलप्रभात लोढा ; गं.भा. ते लव्ह जिहाद… अतिउत्साहामुळे वादांना निमंत्रण

सातारा आणि पाटणमध्ये ‘सायरनवाला मंत्री’ म्हणून ओळखले जाते. पालकमंत्रीपदाचा वापर करीत पाटण आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघ तयार करत आहेत. त्यासाठी वाड्यावस्त्यांपर्यंत रस्ते आणि विकास पोहोचविण्याचे काम करत आहेत. त्यांनी बाजार समिती, ग्रामपंचायती ,जिंकत मतदार संघावर आपली मांड पक्की करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सगळ्यात जास्त निधी त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी आणि साखर कारखान्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आणला . शासनाच्या योजना पुरेपूर राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पाटण येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रही ते उभारत आहेत. पाटणच्या पर्यटनाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कर्नाटक सीमा वादात तात्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र विरोधी वक्तव्य सुधारली नाहीत तर महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणीच सोडणार नाही अशी रोखठोक धमकी त्यांना दिली.

हेही वाचा… जमाखर्च : संदीपान भुमरे, स्वत:पुरतेच रमणारे मंत्री

कोयना धरणग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजवर अनेक आंदोलने सुरु असताना त्यासाठी ठोस कार्यक्रमाची अपेक्षा त्यांच्या येथील स्थानिकांना आहे . मात्र अजून तसे काही दिसले नाही. साताऱ्याच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी असताना सुद्धा जिल्ह्याच्या विकासाचा कोणताही अजेंडा देसाई यांनी राबविल्याचे दिसले नाही.वैद्यकीय महाविद्यालय उभारणी आणि नव्याने विकास कामांसाठी फार सकारात्मकता ते दाखवू शकले नाहीत.

हेही वाचा… जमाखर्च : गुलाबराव पाटील; ‘पाणीवाले बाबां’च्या मतदारसंघातच पाण्याची टंचाई !

सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती असतानाही साताऱ्यातील भाजपशी त्यांचा समन्वय नाही अशी तक्रार नुकतीच कराड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा भाजपाने केली. साताऱ्यातील त्यांच्या निवासस्थाना लगत उदयनराजे यांच्या मालकीच्या भिंतीवर भीतीचित्र काढण्यावरूनही वाद झाला. यानंतर सातारा शहरातील शिवतीर्थ परिसरात नव्याने ‘लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई चौक’ या नावाचे वाहतूक बेट (आयलण्ड)’ उभारण्याची घोषणा स्वतःच करून त्यांनी नव्याने वाद ओढवून घेतला. खरे तर त्यांचे आजोबा लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे सातारा व राज्यासाठी मोठे योगदान आहे .यासाठी व्यापक दृष्टीकोन ठेऊन हा विषय मांडायला हवा होता.त्याला साताऱ्यात सर्वस्तरातून जोरदार विरोध झाला .या विरोधातून साताऱ्यात ‘बालकमंत्री’ असा फलकच फडकविण्यात आला. सामंजस्याच्या राजकारणातून देसाई आजोबांच्या नावे स्मारक किंवा वाहतूक बेट उभे करू शकले असते. मात्र त्यांच्या धडक बेधडक भूमिकेचा साताऱ्यातील त्यांच्या दीर्घकालीन राजकारणावर होणाऱ्या परिणामाची ते फिकीर करत नाहीत. याच विषयावर बोलताना त्यांचा माध्यमांच्या प्रतिनिधींशी वाद झाला. मी माध्यमांना बांधील नाही. तुम्हाला काय लिहायचे ते लिहा , मला काय करायचे ते मी करतो असं बोलून वाद निर्माण केला होता.

देसाई यांचे वकृत्व धारदार आहे.मात्र आपल्याकडे असणाऱ्या अहंकारामुळे ते वाद ओढवून घेतात. स्वतःतील आक्रमकपणामुळे त्यांच्याकडून समतोल साधला जात नाही. मिळालेल्या अधिकाराचा मंत्रीपदाचा सातारा जिल्ह्याला किती फायदा झाला हा मात्र संशोधनाचाच भाग आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shambhuraj desai in one year instead of works disputes and arguments are more highlighted print politics news asj

First published on: 26-06-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×