Sharad Pawar Comeback अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विलीनीकरणाच्या चर्चेपासून शरद पवारांनी स्वतःला दूर ठेवल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य एकत्रीकरणावर पुन्हा एकदा शंका निर्माण झाली आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांमधील महत्त्वाचा दुवा असलेले अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आता पक्षांतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर आले आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातील नेते विलीनीकरणाची चर्चा प्रगत टप्प्यावर असल्याचे सांगत असले, तरी शरद पवारांच्या वक्तव्यावरून ही प्रक्रिया थांबल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, महत्त्वाचे निर्णय आता त्यांच्या गटाला विश्वासात न घेताच घेतले जात असल्याने कुठेतरी त्यांची नाराजी असल्याचे चित्र आहे. सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची अंतर्गत बाब असून त्याबाबत आपल्या गटाशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या टिप्पणीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीत विलीनीकरणाबाबत असलेला विरोध उघड झाला आहे. राष्ट्रवादीतील एका गटाला विलीनीकरण नको आहे, कारण त्यांना स्वतःचे अधिकार, सरकारमधील स्थान आणि पक्षावरील नियंत्रण गमावण्याची भीती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांची चिंता वाढली आहे.
विलीनीकरणाबाबत अजित पवारांची भूमिका
दोन्ही गटांतील ज्येष्ठ नेते हे मान्य करतात की, विलीनीकरणाच्या चर्चेत अजित पवारांची भूमिका केंद्रस्थानी होती. त्यांनीच शरद पवारांशी याबाबत संवाद सुरू केला होता. जयंत पाटील व शशिकांत शिंदे यांसारख्या नेत्यांना चर्चेची जबाबदारी दिली होती. दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी ते आग्रही होते. स्वतः शरद पवारांनी याला दुजोरा देत सांगितले की, “गेल्या चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करत होते. आता ही दुर्दैवी घटना (अपघात) घडली आहे, त्यामुळे आता ही प्रक्रिया थांबेल असे दिसते.” ते पुढे म्हणाले, “या विलीनीकरणाच्या चर्चेत अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांचा सहभाग होता.” अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे या चर्चेचा मध्यस्थ हरवला असून, आता वाटाघाटी पुढे नेणे कठीण झाले असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.
पदांबाबत नेते चिंतेत
२०२३ च्या फुटीनंतर जे नेते अजित पवारांबरोबर राहिले, त्यांच्यापैकी अनेकांकडे सध्या मंत्रिपदे किंवा महत्त्वाची संघटनात्मक पदे आहेत. विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटातील नेत्यांना यातील काही पदे देणे भाग पडेल, ज्यामुळे मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटना या दोन्ही ठिकाणी फेरबदल करावे लागतील. वरिष्ठ नेत्यांच्या मते, यामुळे आपले स्थान किंवा प्रभाव कमी होईल अशी भीती संबंधित नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
एकत्रीकरणामुळे जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते पुन्हा पक्षीय कारभाराच्या केंद्रस्थानी येतील. फुटीनंतर यातील अनेक नेते विरोधी पक्षात गेले होते आणि आता ते संयुक्त पक्ष तसेच सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी प्रयत्न करतील. अजित पवारांच्या उपस्थितीत एकत्रीकरणाला विरोध न करणारे राष्ट्रवादीतील अनेक नेते आता त्यांच्या अनुपस्थितीत नवीन नेत्यांना सामावून घेण्याविरुद्ध आक्रमकपणे बोलू लागले आहेत.
शरद पवार पुन्हा सक्रिय
या नेत्यांसाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे, पक्षाच्या धोरणांवर शरद पवारांचे पुन्हा वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीच निर्णय प्रक्रियेत मुख्य भूमिका असेल. फुटीनंतर अजित पवार गटात ज्या नेत्यांचा उदय झाला, त्यांना आता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपला प्रभाव कमी होईल असे वाटत आहे.
राष्ट्रवादीतील मूळ फूट ही काही अंशी शरद पवारांच्या नेतृत्वावरील असंतोष, तसेच पक्षातील सदस्यांच्या मागण्यांपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक विचारधारेनुसार पक्ष चालवण्याच्या आग्रहामुळे पडली होती. राष्ट्रवादीने स्थापनेपासूनचा बहुतांश काळ सत्तेत घालवला. मात्र, राज्यात जेव्हा भाजपाची ताकद वाढली तेव्हा कार्यकर्त्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांच्याशी हातमिळवणी न करण्याचा पवारांचा निर्णय फुटीला कारणीभूत ठरला होता.
तसेच, एकत्रित झालेली राष्ट्रवादी भाजपाच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’मध्ये कशी काम करेल, याबद्दलही शंका आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष भाजपावरील अवलंबित्व कमी करू शकतो आणि आपली राजकीय भूमिका बदलू शकतो, अशी भीती अजित पवार गटातील नेत्यांना आहे. हे नेते सरकारमधील आपल्या सध्याच्या भूमिकेला मोठा फायदा मानतात. एकत्रीकरणामुळे महायुतीमधील त्यांचे स्थान कमकुवत होऊ शकते अशी त्यांना भीती आहे.
शरद पवारांबाबत भाजपाची साशंकता
विलीनीकरणाच्या कोणत्याही हालचालीत भाजपा हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. राजकीय निरीक्षकांच्या मते, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रवादीशी व्यवहार करताना भाजपाची भूमिका अधिक सावध असेल. शरद पवारांचा प्रदीर्घ अनुभव आणि वाटाघाटी करण्याची क्षमता त्यांना युतीच्या राजकारणात अधिक प्रभावशाली ठरवते. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी खातेवाटप, धोरणे आणि जागावाटप यांसारख्या मुद्द्यांवर अधिक कठोर भूमिका घेऊ शकते.
दुसरीकडे, मंत्रिपदे भूषवणारे अजित पवार गटातील नेते भाजपावर अधिक अवलंबून असल्याचे मानले जाते, त्यामुळे त्यांच्याशी समन्वय साधणे सोपे होते. शरद पवार पुन्हा मुख्य भूमिकेत आल्यास राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीच्या स्थिरतेवर होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

