‘राजकारणात महत्त्वाची विधाने करायला परिपक्वता लागते. पार्थ पवारांकडे ही परिपक्वता किती आहे हे मी आज सांगू शकत नाही’, असे विधान करीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. लोकसभेची मावळ मतदारसंघातील निवडणूक लढणे किंवा अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवरून मागे शरद पवारांनी नातवाचे कान उपटले होते.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून पार्थ पवार यांनी नापसंती व्यक्त करताना महाराष्ट्रात काँग्रेसची अधोगती सुरू झाल्याचे म्हटले होते. एकीकडे काँग्रेसने माघार घ्यावी म्हणून प्रफुल्ल पटेल व अन्य नेते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करीत आहेत. दुसरीकडे, पार्थ पवार यांनी काँग्रेसला डिवचले. पार्थ पवार यांच्या विधानाकडे शरद पवारांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी पार्थ पवार यांच्यात किती परिपक्वता आहे हे मी आज सांगू शकत नाही, असे विधान करीत नातवाला चांगलेच सुनावले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येचा विषय गाजला होता. भाजपने तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण तापविले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतसिंह मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यावरून शरद पवार प्रचंड भडकले होते. ‘पार्थ पवार याच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही’, असे शरद पवार म्हणाले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून लढण्याचा हट्ट पार्थ पवार यांनी धरला होता. तेव्हा शरद पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तरीही पार्थ पवार यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यात पार्थ पवार यांचा पराभव झाला होता.
अजित पवारांच्या पश्चात पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली असली तरी पडद्याआडून सारी सूत्रे ही पार्थ पवार हे हलवितात, असे बोलले जाते. पार्थ पवार यांनी स्वतःला राज्यसभेची खासदारकी मिळवली. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचे खच्चीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविल्याचा आरोप होत आहे. निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात पटेल व तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. हा वाद वाढू लागताच पार्थ पवार यांना खुलासा करावा लागला. त्यात पटेल व तटकरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
विलीनीकरणाची चर्चा नाही हे शरद पवारांचे विधान व पार्थ पवार यांच्या परिपक्वतेवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला खीळ बसल्याचे मानले जाते.
