अमृतमहोत्सवी कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तोंडभरून कौतुक केले असले तरी काही वर्षांपूर्वी खडसे हे विरोधी पक्षनेते असताना पवारांनी त्यांच्यावर तोडपाणी करीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. ‘राज्यात भाजप रुजविण्यात एकनाथ खडसे यांचा योगदान मोठे आहे. एकेकाळी त्यांनी १२ खाती भूषविली होती. सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी विरोधी बाकांवरून आक्रमकपणे मांडले’ अशी स्तुतीसुमने शरद पवारांनी खडसे यांच्यावर उधळली. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फटका बसल्यावर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतर खडसे हे शरद पवारांबरोबर राहिले. परंतु , खडसे विरोधी पक्षनेते असताना शरद पवारांनी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. विरोधी पक्षनेतेपदी असताना खडसे यांनी शरद पवार तसेच राष्ट्रवादीवर काही आरोप केले होते. तेव्हा केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या पवारांनी खडसे यांच्यावर विरोधी पक्षनेते तोडपाणी करीत असल्याचा आरोप केला होता.
वास्तविक, शरद पवार हे नेहमी सर्वपक्षीय नेत्यांचा आदर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच कोणाच्या विरोधात फारशी वैयक्तिक स्वरुपाची टीकाटिप्पणी करीत नाहीत. गोपीनाथ मुंडे, गो. रा. खैरनार यांनी पवारांच्या विरोधात यथेच्छ आरोप केले होते. पण पवारांनी कधीही वैयक्तिक स्वरुपाची किंवा पातळी सोडून टीका केली नव्हती. मात्र, खडसे यांच्यावर तोडपाणी करीत असल्याचा आरोप केला होता. पवारांच्या या आरोपांचे तेव्हा पडसाद उमटले होते. खडसे यांनी आरोपांचा इन्कार केला होता. शरद पवारांनी मागे एकदा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर जातीवरून केलेली टिप्पणी अशीच गाजली होती.
खडसे यांना आमदारकी
भाजपमध्ये नाराज झालेल्या व पक्षात काही स्थान मिळण्याची शक्यता नसल्यानेच एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काही वर्षांपूर्वी तोडपाण्याचा आरोप केलेल्या खडसेंना पवारांन मानाचे स्थान दिले. त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. मध्यंतरी खडसे हे भाजपमध्ये परतण्यास उत्सुक होते. त्यांनी नवी दिल्लीत आपला भाजप प्रवेश होईल, असे जाहीरही केले होते. आपण राष्ट्रवादी सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. पण खडसे यांच्या पक्ष प्रवेशास राज्यातील नेत्यांकडून विरोध झाला. परिणामी खडसे यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. मग खडसे यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले.
