Sharad Pawar Eknath Shinde Meet : महाविकास आघाडीतील (MVA) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित भेटीनंतर आघाडीच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे राजकीय गणितांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून या घडामोडींवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत तसेच भविष्यातील राजकीय रणनितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय स्पर्धेत टिकू शकेल का? समीकरणं काय सांगतात, जाणून घेऊ सविस्तर
शरद पवारांनी बुधवारी विधानभवनात एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात ही भेट झाली. यावेळी शिंदेंनी पवारांचे स्वागत करुन सत्कार देखील केला. यामुळे मात्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिंदे यांच्या कार्यालयाने ही एक अराजकीय सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये दोन्ही पक्षांकडून नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे आणि शरद पवार उपस्थित राहिले होते. मात्र या भेटीनंतर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरेसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भेटीवरुन ठाकरेसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, शरद पवारांकडून ‘गद्दारांचे उद्दातीकरण केले जात आहे.’ राऊतांनी पुढे अशीही टीका केली की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. ज्या एकनाथ शिंदेंनी मूळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी बंडखोरी केली त्यांच्याच कार्यालयात शरद पवार गेले, हे योग्य नाही. यामुळे ठाकरे गट अस्वस्थ झालाय आणि दुखावला गेला आहे.
संजय राऊत यांनी असाही इशारा दिला की, अशा प्रकारच्या भेटींमुळे विरोधकांची राजकीय भूमिका कमकुवत होऊ शकते आणि शरद पवार यांच्या पक्षाची जनतेतील विश्वासार्हता देखील कमी होऊ शकते. ‘आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मविआच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांनी नियम पाळायला पाहिजेत, असेही राऊतांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ‘राजकारण हे भावनांवर नव्हे, तर गणितावर चालते’ असे म्हटले आहे. तर, ‘एका भेटीमुळेच महाविकास आघाडी डळमळीत होत असेल, तर आघाडीचा पाया किती मजबूत आहे,’ यावरच प्रश्न उपस्थित होतो, असे पक्षातील एका नेत्याने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या संजय राऊत यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील. ही संपूर्ण चर्चा क्षुल्लक आहे, त्यामुळे जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.
अलीकडच्या काळात महाविकास आघाडीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आघाडीतील एकजूटीला तडा गेल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे अंतर्गत विरोध वाढत असल्याचे चित्र आहे.
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा लोकसभा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.
- खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला आघाडीतील ६० पैकी २३ आमदार अनुपस्थित राहिले. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे विविध चर्चा रंगल्या
- बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘आपण खरोखर एकत्र आहोत का?’ असा प्रश्न उपस्थित केला. यातून त्यांची मित्रपक्षांबाबतची नाराजी दिसून आली.
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांच्या आघाडीत अस्थिरता असल्याचे विधान केले आहे. राष्ट्रवादीत काही खासदार नाराज आहेत, ते पक्षांतराच्या तयारीत आहेत, चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
