कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत संख्याबळानुसारच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रवेश करणाऱ्यांची छाननी करूनच यापुढे प्रवेश दिला जाणार आहे, असेही पवार यांनी एका प्रश्नावेळी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीने निवडणुकीआधी मुख्यमंत्री ठरवावा; त्याला माझी संमती असेल, असे विधान केले होते. ठाकरे यांच्या विधानाकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, की १९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोणताही चेहरा नसताना जनतेने मतदान केले होते. मुख्यमंत्रिपदापेक्षा राज्यातील जनतेला स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे. हेही वाचा >>>कारण राजकारण: गुवाहाटीहून परतलेल्या ठाकरेंच्या शिलेदाराची कसोटी मुख्यमंत्र्यांची आंदोलनावरील टीका चुकीची मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेवर बोलताना पवार म्हणाले, की या पुतळ्याचे काम दिलेल्या शिल्पकाराने इतके मोठे काम यापूर्वी कधीही केलेले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाऱ्याचा वेग वाढल्याचे कारण सांगत असले, तरी ते रास्त नाही. या विरोधात मुंबईत आम्ही आंदोलन केले. त्यावर आम्ही राजकारण करत असल्याची टीका होत असली तरी ती निरर्थक आहे, असे पवार म्हणाले.