scorecardresearch

‘ब्राह्मणविरोधी’ ठसा पुसण्यासाठीचे शरद पवार यांचे पहिले पाऊल!

राष्ट्रवादीवर उमटलेला ब्राह्मणविरोधी हा ठसा पुसण्यासाठी केलेला हा पहिला प्रयत्न असला तरी हा प्रयत्न थेट पवार यांनीच केल्यामुळे या बैठकीचा योग्य तो संदेश राष्ट्रवादीच्या नेत्यापर्यंत पोहोचेल, असे चित्र या बैठकीने निर्माण केले.

sharad pawar brahman mahasangh

मतभेद होते, पण मनभेद नव्हते. मतभेद दूर झाले असून आमच्या शंकांचे निरसन झाले, ही समस्त ब्राह्मण समाज या संस्थेचे राज्य समन्वयक प्रा. मनोज कुलकर्णी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यात ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण समाजाने आंदोलने करून राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. या विधानांमुळे राष्ट्रवादीवर जोरदार टीकाही सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. राष्ट्रवादीवर उमटलेला ब्राह्मणविरोधी हा ठसा पुसण्यासाठी केलेला हा पहिला प्रयत्न असला तरी हा प्रयत्न थेट पवार यांनीच केल्यामुळे या बैठकीचा योग्य तो संदेश राष्ट्रवादीच्या नेत्यापर्यंत पोहोचेल, असे चित्र या बैठकीने निर्माण केले.

पक्षातील काही सहकाऱ्यांच्या विधानांमुळे ब्राह्मण संघटनांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे कोणत्याही जाती-धर्मांबद्दल विधान करू नये, अशी समज पक्षातील सहकाऱ्यांना दिली असल्याचे पवार यांनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितल्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. त्या बरोबरच ब्राह्मण समाजाने केलेल्या आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचा शब्दही पवार यांनी या बैठकीत दिला. त्यामुळे एकूण बैठक सकारात्मक झाली, अशी बैठकीत उपस्थित राहिलेल्यांची पहिली प्रतिक्रिया होती.

ब्राह्मण समाजात अस्वस्थता होती. ती माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत होती. त्यांनी अशी विधाने केल्यानंतर पक्षात आमची चर्चा झाली. त्यात कुठल्याही जाती-धर्माविरोधात कोणीही वक्तव्य करू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. पक्षाच्या अध्यक्षाने सांगितल्यानंतर सहकाऱ्यांपर्यंत योग्य तो संदेश गेला आहे, असे पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे ज्या कारणावरून वाद निर्माण झाला, ती विधाने वा ब्राह्मण समाजाची होत असलेली टिंगल टवाळी त्यांना मान्य नसल्याचेही बैठकीतील उपस्थितांना योग्यरीत्या समजले. या बैठकीनंतर सकारात्मक बैठक झाली.

ब्राह्मण समाजाने केलेल्या इतर मागण्यांबाबतही योग्य ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या बैठकीत मिळाल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

राज्यातील एकूणच राजकीय वातावरण गेल्या काही महिन्यांपासून बिघडले आहे. अशा परिस्थितीत ब्राह्मण समाज विरुद्ध राष्ट्रवादी असाही नवा वाद त्या पक्षातील काही नेत्यांच्या विधानांमुळे निर्माण झाला. अशावेळी जो समाज आपल्या विरोधात उतरला आहे, त्याच्याशीच थेट चर्चा करण्याचा मार्ग पवार यांनी स्वीकारला. सध्या असलेल्या टोकाच्या राजकीय कटुतेच्या वातावरणात असे काही घडण्याची अपेक्षाच कोणी केली नव्हती. त्यामुळेच या बैठकीवर ब्राह्मण महासंघ या संघटनेने तातडीने बहिष्कारही जाहीर केला.

ही बैठक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकाराने बोलावण्यात आली होती. ब्राह्मण समाजात राष्ट्रवादीबद्दल असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. संवाद साधण्यासाठी ही बैठक होती. तणावाचे वातावरण निवळावे, हा उद्देश होता. राजकारणाएेवजी सामाजिक विषय म्हणून याकडे पाहिले पाहिजे, अशा शब्दात गारटकर यांनी या बैठकीबाबत भाष्य केले आहे.
सामाजिक दुरावा, जातींमधील कटुता, राजकीय अभिनिवेषातून होणारे आरोप अशा सगळ्या वातावरणात थेट चर्चा, संवाद ही जुनी पद्धत लुप्त झाल्यासारखी परिस्थिती आहे. ब्राह्मण समाज संघटनांशी थेट संवाद साधून पवार यांनी ही कोंडी फोडली आहे, असे म्हणता येईल.

गेल्या दोन-तीन महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी ब्राह्मण समाजाबद्दल टीका, टिप्पणी करत होते. याबाबत पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यावर अशाप्रकारे कोणत्याही समाजाबद्दल मत व्यक्त करणे चुकीचे असून समाजात दुही निर्माण होईल, अशा पद्धतीने वक्तव्य न करण्याबाबत संबंधितांना पक्षांतर्गत समज दिलेली असल्याचे पवार यांनी आम्हाला सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस ब्राह्मण समाजासोबत असल्याची ग्वाही पवार यांनी या वेळी दिली.

गोविंद कुलकर्णी, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ 

समाजाच्या वतीने पवार यांना एक निवेदन देण्यात आले. त्यामध्ये ब्राह्मण समाजाला सन्मानाने जगू द्यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ असावे, राष्ट्रवादीच्या विविध नेते, पदाधिकाऱ्यांकडून समाजाबाबत होणाऱ्या टिंगल-टवाळीला स्वत: पवार यांनी आळा घालावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. त्यावर पवार यांनी महामंडळाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक घेण्याची तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना समज देण्याची ग्वाही दिली.

 भालचंद्र कुलकर्णी, संपादक, आम्ही सारे ब्राह्मण 

ब्राह्मण समाजाच्या प्रगतीची पवार यांनी प्रशंसा केली. समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जातीवाचक टिप्पणी होऊ नये याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

वसंतराव गाडगीळ, संस्थापक, शारदा ज्ञानपीठम्

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar meeting with brahman mahasangh maharashtra politics pmw

ताज्या बातम्या