महाराष्ट्रातील आजच्या राजकीय घडामोडी : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची अफवा पसरवली, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी केला… भाजपाच्या रॅलीत हनुमानाच्या वेषात एक व्यक्ती नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली…मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी योजनेतील घरे लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला… अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असते. गेल्या महिन्यात ठाकरे गटातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटाची कास धरली. यादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपाचे विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिल्याने या चर्चांनी आणखीनच जोर पकडला. मात्र, शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांनी खंडन केले. सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्याची मला गंमत वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे शरद पवार हे भाजपाबरोबर जाणार असल्याच्या अफवांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या दान चोरी प्रकरणाच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. आमचे आंदोलन आंदोलन चिरडले जावे आणि लोकांनी आंदोलनाला येऊ नये, म्हणून फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटीची अफवा पसरवली. कुठलाही धोका नसताना त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी होणार असल्याचा फुगवटा तयार करण्यात आला, असा आरोप सपकाळ यांनी केला. फडणवीस यांचा कारभार सुलतानी असून त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणे-घेणे नाही. सध्या ते फोडाफोडीत व्यस्त असल्याची टीकाही सपकाळ यांनी केली. त्यांच्या या टीकेवर आता भाजपाकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आमदार अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाने बनावट कागदपत्रे तयार करून रमाई आवास योजनेतील घरे लाटण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. विशेष बाब म्हणजे, यावेळी सरकारकडूनही रमाई आवास योजनेत घरे लाटण्याचा प्रयत्न झाल्याची कबुली देण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्ये रमाई आवास योजनेत घरे घेण्यासाठी जी कागदपत्रे वापरण्यात आली त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मालमत्ता कर पावती तसेच एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या नावाचे रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या प्रती असल्याचे दानवे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर उत्तर देताना कागदपत्रांचा गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार, असे आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

आदित्य ठाकरे यांचा भाजपावर तीव्र संताप

अयोध्येतील राम मंदिरातील देगणीत झालेल्या अपहाराच्या मुद्द्यावरून वादंग उठला असतानाच भाजपाच्या लखनौ येथील रॅलीतील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या स्वागतासाठी एक व्यक्ती हनुमानाच्या वेषात नाचत असल्याचे दिसून आले. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर तीव्र संताप व्यक्त केला. हनुमानाच्या वेषातील व्यक्तीला भाजपचा झेंडा हातात घेऊन भाजपा अध्यक्षांच्या स्वागतासाठी नाचायला लावले हे पाहून धक्का बसला आहे. सरकारने नेमलेल्या विश्वस्तांनी अयोध्येतील राम मंदिराची जी लूट केली आहे, त्यावर भाजप इतकी शांत कशी काय आहे. हे आमच्या सर्वांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. किती हा निर्लज्जपणा! आता हिंदू माफ नाही करणार, अशी टीका आदित्य यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत

अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्तांना तातडीने मदत केली जाणार असून याची महसूल विभाग दक्षता घेईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले. तसेच जीवितहानी, वित्तहानी आणि इतर नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. महसूल विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण पारदर्शक व अचूक पद्धतीने केले जाईल. कोणताही पात्र लाभार्थी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे मंत्री बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.