NCP Merger दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी ही जबाबदारी घेतल्याने आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन गटांमधील मतभेद मिटण्याची आणि विलीनीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल पडण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नव्या अध्यक्षांची नियुक्ती म्हणजे ‘सुनेत्रा पर्वा’ची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, ते शरद पवार गटाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. सुनेत्रा पवार या स्वतःच्या अटींवर पक्ष चालवतील आणि अजित पवारांचा राजकीय वारसा व विचार पुढे नेतील. या घडामोडींमुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत. ते म्हणजे राष्ट्रवादीने आता शरद पवार गटाकडे पाठ का फिरवली आहे? ‘सुनेत्रा पर्वा’ने शरद पवार गटाच्या नेतृत्वासमोर राजकीय आव्हान उभे केले आहे का? एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर याचे काय परिणाम होतील?
सुनेत्रा पवारांनी स्वीकारली राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे
मुंबईतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा भाषण केले. अजित पवारांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या भाषणात दिली. तसेच राजर्षी शाहू, जोतिराव फुले आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित अजित पवारांच्या धोरणांना समोर ठेवून आपण काम करू, असे सांगितले. या भाषणादरम्यान अजित पवारांच्या भव्य पोस्टरसमोर उभ्या असलेल्या सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या वागण्यात खंबीरपणा दिसत होता आणि त्यांच्या मनात असलेली वेदनाही स्पष्टपणे जाणवत होती.
शरद पवारांविरोधात टीकेचा सूर
राष्ट्रवादीच्या या मेळाव्यात अनेक नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना लक्ष्य केले, त्यामुळे दोन्ही गटांमधील मतभेद पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले, “आम्ही आमचा पक्ष कसा चालवायचा हे ते (शरद पवार गट) आम्हाला कसे काय सांगू शकतात?”. राज्याचे कॅबिनेट मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवारांचे अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच त्यांनी (शरद पवार गट) विलीनीकरणाच्या गप्पा सुरू केल्या. एवढी घाई कशासाठी? त्यांनी राजकारण सुरू केले, म्हणूनच राष्ट्रवादीला सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची प्रक्रिया घाईने उरकावी लागली. आता सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीला प्रश्न विचारण्याचा त्यांना काय अधिकार आहे?”
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर टीका करत म्हटले, “२००४ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा राष्ट्रवादी सर्वांत मोठा पक्ष ठरला होता, तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकले असते; पण काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही अजितदादांसारख्या सक्षम नेत्याला त्या पदापासून वंचित ठेवले.” या मेळाव्यात अजित आणि सुनेत्रा पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांची मार्चमधील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली. त्यामुळे पक्षात सुनेत्रा पवार कुटुंबाचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे.
सत्ताधारी महायुतीचा घटक असल्याने राष्ट्रवादीकडे पार्थ यांना वरिष्ठ सभागृहात निवडून आणण्यासाठी पुरेसे आमदार आहेत. दुसरीकडे, शरद पवारांचे राज्यसभा सदस्य म्हणून टिकून राहणे आता विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या एकत्रित निर्णयावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)कडे केवळ १० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या २० आणि काँग्रेसच्या १६ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय पवारांना त्यांची राज्यसभेची जागा राखणे कठीण जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही अनिश्चितता
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही अनिश्चिततेचे वातावरण आहे. पक्षातील अनेक चेहरे असा प्रश्न निर्माण करत आहेत की, राष्ट्रवादीचे नेतृत्व २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय सुनिश्चित करू शकेल का? विलीनीकरणाच्या बाजूने असलेल्या राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “सर्व काही शांत दिसत असले तरी पक्षाच्या आत अस्वस्थता आहे. भविष्यात काय होईल याची प्रत्येकाला चिंता आहे.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा शरद पवारांनी (जून १९९९ मध्ये) स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी त्याला विरोध केला होता. याचे कारण म्हणजे त्यांचे काँग्रेसबरोबरचे संबंध केवळ राजकीय नसून, भावनिक आणि पिढ्यान् पिढ्यांचे होते. तरीही, बहुतांश नेत्यांनी तत्कालीन नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला, कारण- त्यांचा शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास होता.”
जुलै २०२३ मध्ये जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला होता. तेव्हादेखील त्यांच्या गटात सामील झालेल्या बहुतेकांनी शरद पवारांना कल्पना देऊनच हा निर्णय घेतला होता. “आम्ही पवार आणि अजितदादांमध्ये कधीही फरक केला नाही. आमच्यासाठी दोन वेगळे पक्ष केवळ कागदावर होते. आम्हाला माहीत होते की, हे मतभेद परिस्थितीमुळे निर्माण झाले आहेत आणि आज ना उद्या आमचे विलीनीकरण होईलच,” असे दोन्ही गटांतील अनेक नेत्यांनी सांगितले. परंतु, अजित पवारांच्या अकाली निधनानंतर विलीनीकरणाच्या आशा संपुष्टात आल्याचे त्यांनी सांगितले.
विलीनीकरणाचे दरवाजे बंद?
विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) च्या एका नेत्याने सांगितले, “विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या पुढाकाराने प्रगत टप्प्यावर होती, तरीही शरद पवार स्वतः एनडीएमध्ये सामील झाले असते की नाही, याचा अंदाज आम्ही लावू शकत नाही. ते कदाचित तटस्थ राहिले असते. पण, मला एक खात्रीने माहीत आहे की, अजितदादांना दोन कारणांमुळे विलीनीकरणाची घाई होती. एक म्हणजे, आपली आई आशाताई आणि शरद पवारांच्या उपस्थितीत विलीनीकरण करून काकांपासून वेगळे झाल्याचा डाग पुसून टाकणे आणि दुसरे म्हणजे स्वतंत्र राहिलो, तर भाजपा आपल्याला संपवून टाकेल, अशी भीती त्यांना वाटत होती.”
रोहित पवार विलीनीकरणाविषयी बोलताना म्हणाले, “विलीनीकरण कोणाला हवे आहे? मी पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले आहे की, आम्हाला विलीनीकरण नको आहे. आमची लढाई अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्यांचा अपघात नेमका कशामुळे झाला, हे महाराष्ट्रातील जनतेला समजायला नको का?”. राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांतील संघर्ष पुन्हा पेटल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे त्यांचे विलीनीकरण होऊ न देण्याची भाजपाची रणनीती आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
