पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरत थेट भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना एक लाखहून अधिक मतांनी पराभूत करण्याचा पराक्रम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे या सामान्य शिक्षकाने दिंडोरी मतदारसंघात केला. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे राजकीय घराणेशाहीचा वारसा, केंद्रातील मंत्रिपद, महायुतीचा संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव, पक्षाची बलाढ्य यंत्रणा, साधन-सामग्रीची रेलचेल तर, दुसरीकडे सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, निवडणूक लढविण्यासाठी निधीची चणचण, पक्षाचा एकही आमदार नसणे, अशी प्रतिकूल परिस्थिती. या स्थितीत डॉक्टर विरुद्ध शिक्षक लढाईत पहिल्याच प्रयत्नात भगरे हे निवडून आले. त्यांना जनतेकडून केवळ मते मिळाली नाही तर, प्रचारावेळीच गावागावातून शक्य तितका निधी संकलित करून दिला गेला.

दिंडोरीतील पाराशरी नदीकाठावरील गोंडेगाव हे त्यांचे मूळ गाव. शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या भगरेंनी एम. ए. बीएडपर्यंत शिक्षण घेतले. पिंपळगाव बसवंत येथील कन्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरपंच, पंचायत समिती सभापती- उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य हा त्यांचा राजकीय प्रवास आता दिल्लीत लोकसभेपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा…हातकणंगलेत मुख्यमंत्री शिंदे यशाचे किमयागार

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शाखाध्यक्ष, तालुकाध्यक्षपदावर त्यांनी काम केले. स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना चांगलीच जाण आहे. अनेक शेतकरी आंदोलनांमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर दिंडोरी लोकसभेतील चारही आमदार अजित पवार गटात गेले. भगरे गुरुजी मात्र शरद पवारांबरोबर राहिले. निवडणुकीत त्यांनी भाजपचा बालेकिल्ला हिसकावलाच, शिवाय अजित पवार गटाच्या चारही आमदारांना हादरा दिला आहे.