पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार की नाही, याबाबत संदिग्धता असताना बारामतीसाठी शरद पवार यांनीही नवा डाव टाकल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते युगेंद्र पवार निवडणूक लढविण्याची चर्चा आहे. मात्र, बुधवारी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असताना प्रत्यक्षात ‘बारामती’साठी कोणीच इच्छुक मुलाखतीला समोरा गेला नाही. त्यामुळे, बारामतीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल, याचा अंदाज घेऊनच युगेंद्र पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बुधवारी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ‘बारामती’चे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने होत आहे. त्यामुळे ‘बारामती’साठी युगेंद्र पवार मुलाखत देणार का, तसेच पक्षातून अन्य कोणी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे का, याची उत्सुकता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती. मात्र, बुधवारी युगेंद्र पवार यांच्यासह अन्य कोणीही इच्छुक मुलाखतीसाठी आले नाहीत. त्यामुळे, आधी प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल, याचा अंदाज घेऊन मगच ‘बारामती’चा उमेदवारी जाहीर करण्याची खेळी केली जाईल, अशी चर्चा पक्षामध्ये आहे.
बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरू झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीची लढत अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ‘मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या, बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस राहिलेला नाही,’ असे विधान करून बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंदर्भातही चाचपणी केल्याची चर्चा आहे. तर, अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी, अशी समर्थकांची आग्रही मागणी आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळेच उमेदवारीबाबत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तूर्त सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ‘उमेदवारीसंदर्भात बारामतीमधील शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटले आहे. बारामतीच्या उमेदवारीसंदर्भात त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत बारामतीचा उमेदवार जाहीर केला जाईल,’ अशी प्रतिक्रिया बारामतीच्या खासदार सुळे यांनी दिली.
बारामती हा खास मतदारसंघ आहे. एका पक्षाचे अध्यक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे बारामतीमधून कोण उमेदवार असेल, याचा निर्णय शरद पवारच घेतील. बारामतीसाठी पक्षाची खास रणनीती आहे.
रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)