मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीला रस नाही या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा लवकर जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असताना काँग्रेसची त्याला तयारी नाही. पवारांनी या वादापासून दूर राहण्याचे टाळले असले तरी आता ठाकरे आणि काँग्रेसमध्येच मुख्यमंत्रीपदावरून गुंतागुंत वाढणार आहे.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे सातत्याने करीत आहेत. पण काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्याला प्रतिसाद दिला जात नव्हता. या पाश्वर्भूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाबाबत रस नाही अशी भूमिका मांडून या वादात पडण्याचे टाळले आहे. कोणत्याही आघाडीत जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे साधे सरळ सूत्र असते. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हे सूत्र मान्य नसावे. आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी त्यांची भूमिका आहे. तसेच सर्वाधिक जागा हे सूत्र असता कामा नये, अशी संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.

हेही वाचा…‘लाडकी बहीण’ योजनेतून दर वर्षी ४६ हजार कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद हवे आहे ही त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. राज्यात सर्वाधिक १३ खासदार काँग्रेसचे निवडून आले आहेत. विधानसभेतही सर्वाधिक आमदार आपले निवडून येऊ शकतात, असे काँग्रेसचे गणित आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आणि सर्वाधिक आमदार निवडून आल्यास हातातोंडाशी आलेला घास काढल्यासारखे होईल, अशी काँग्रेस नेत्यांना भीती वाटते. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नावाला आधीच समंती दिल्यास काँग्रेसच्या मतांवरही परिणाम होऊ शकतो.

महाविकास आघाडीत आधी जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप हे वाटते तेवढे सोपे नाही. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. तेथे शरद पवार गटाचे फारसे संघटन नाही. पश्चिम विदर्भात ठाकरे गटाचे काही ठिकाणी वर्चस्व आहे. विदर्भातील जागावाटपातही तिन्ही पक्षांमध्ये चुरस होऊ शकते. मुंबईत ठाकरे गटाला अधिकच्या जागा हव्या असल्या तरी काँग्रेसही जास्त जागांसाठी आग्रही आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार. मराठवाड्यात पुन्हा तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ होऊ शकते.

हेही वाचा…फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख रिंगणात? विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढतीची शक्यता

जागावाटप करून लोकांमध्ये सशक्त पर्याय म्हणून सामोरे जाण्याचे महाविकास आघाडीसमोर आधी आव्हान असेल. लोकसभेचेच चित्र कायम राहिल असे नाही. महायुती तेवढ्याच ताकदीने रिंगणात उतरणार आहे. या साऱ्यांवर मात करून महाविकास आघाडीला यश मिळविण्याचे आव्हान पार करावे लागणार आहे.