नागपूर : महाविकास आघाडीत नागपूरच्या जागा वाटपात ऐनवेळी झालेला बदल अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पथ्यावर पडणारा ठरला, काँग्रेसला हवी असलेल्या हिंगण्याच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीने नागपूर शहरातील पूर्व नागपूरची जागा मिळवून घेतली. नागपुरात या पक्षाची असलेली जेमतेम ताकद बघता काँग्रेसने ही जागा का सोडली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूरच्या सहाही जागा आतापर्यंत काँग्रेसच लढत आली. पूर्व नागपूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीस चतुर्वेदी यांनी हा मतदारसंघ बांधला होता. २००४ मध्ये भाजपने प्रथम ही जागा जिंकली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. सातत्याने येथे काँग्रेस पराभूत होत असल्याने ही जागा या पक्षाने सोडावी म्हणून पूर्वीही राष्ट्रवादीकडून (एकसंघ) मागणी केली जात होती. आता महाविकास आघाडीतून शिवसेनेकडून (ठाकरे) मागणी केली होती. पण काँग्रेसने कधी ही जागा सोडण्याची दर्शवली नाही. २०२४ मध्येही पूर्व नागपूरमधून लढण्यास अनेक जण इच्छुक होते. विशेषत: या मतदारसंघातून महिलेला संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे पूर्वमधून काँग्रेसच लढणार हेच चित्र कालपर्यंत होते. मात्र जागा वाटपात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वादाचा पुरेपूर फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला. शिवसेनेला रामटेक, काँग्रेसला दक्षिण देतानाच काँग्रेसलाच हवी असणारी हिंगण्याची जागा त्यांना देऊन राष्ट्रवादीने नागपूर शहरात स्वत:साठी एक जागा मिळवून घेतली.
हेही वाचा – पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच !
हेही वाचा – विधानसभा आचारसंहितेच्या निर्बंधांमुळे शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनांवर बंधने
लोकसभा निवडणूक झाल्यावरच सुनील केदार यांनी हिंगण्यात पुढच्या काळात महाविकास आघाडीचा आमदार असेल असे जाहीर केले होते. काँग्रेसला हिंगण्याची जागा हवी होती व आघाडीत ती राष्ट्रवादीकडे आहे. याही मतदारसंघात राष्ट्रवादी सलग तीन वेळा पराभूत झाल्याने या पक्षाचे बळ येथे कमी झाले आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडावी, अशी आग्रहाची भूमिका काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मांडली होती. हाच धागा पकडून हिंगण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने पूर्व नागपूर पदरात पाडून घेतले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने जागा न सोडता तेथून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी उमेदवारही ठरला होता. पण ऐनवेळी हा प्रस्तावही बारगळला. आणि राष्ट्रवादीचे नागपूर शहराचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी मिळाली. पेठे हे राष्ट्रवादीच्या फुटीच्या वेळी शरद पवार यांच्यासोबत होते. त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळाले. ते राष्ट्रवादीचे शहरातील एकमेव नगरसेवक होते. त्यांची लढत भाजपचे बलाढ्य उमेदवार कृष्णा खोपडे यांच्यासोबत होणार आहे. काँग्रेस या निवडणुकीत राष्ट्रवादीला किती साथ देते यावरच पेठेंचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.