विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता
छत्रपती संभाजीनगर : नगरपंचायतीमध्ये नेतृत्व करताना स्वपक्षातील आणि भाजपच्या त्रासाला एकट्याने सामोरे जाणाऱ्या संगीता लहाने यांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी रात्री थेट जाफराबाद गाठले. या महिलेच्या पाठीशी आपण उभे आहोत, हा संदेश जावा म्हणूनच जाफराबादपर्यंत जाऊन आलो असे पवार यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. जाफराबादच्या नगराध्यक्षा संगीता लहाने यांच्यावर भाजपच्या पुढाकाराने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मंडळींनी अविश्वास ठराव आणला होता. एखाद्या नगरपंचायतीपर्यंतच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन बळ देण्याची ही अलिकडची घटना राजकीय पटलावर महत्त्वपूर्ण मानली जात आहे.




२०२० मध्ये जाफराबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीत संगीता लहाने निवडून आल्या होत्या. त्यांनी सरदार रावरंभा निंबाळकर यांच्या घराण्याच्या इतिहासावर पीएच.डी. केली आहे. निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद देण्यात आले. जाफराबाद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस-७, काँग्रेसचे ६, भाजप-१ आणि भाजपचे सहयोगी अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. संगीता लहाने यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आणि राष्ट्रवादीतील व काँग्रेसमधील सदस्यांसह लहाने बैठका घेत नाही आणि विश्वासातही घेत नाही, असा आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव आणल्याबाबतची तक्रार करण्यात आली. ही बाब राजेश टोपे यांनी शरद पवार यांना सांगितली. भाजपच्या नेत्यांकडून सदस्य फोडून त्रास दिला जात आहे असे पवारांना सांगण्यात आले आणि पवार यांनी मी तुमच्याकडे चहाला येतो असे लहाने यांना कळविले. त्यांना शरद पवार घरी येतील असे वाटले नव्हते. मंगळवारी ‘सौहार्द’ बैठकीनंतर पवार जाफराबाद येथे पोहोचले. त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर ते पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे परतले.
आणखी वाचा-सोलापूरमध्ये पाय रोवण्यावर भारत राष्ट्र समितीचा भर, भगीरथ भालके चंद्रशेखर राव यांच्या भेटीला
मात्र, या भेटीमुळे नगरपंचायतीतील राजकारणात कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, याचा धडा त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना घालून दिला. जाफराबाद नगरपंचायतीचा भाग भोकरदन विधानसभेत येतो. या विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व चंद्रकांत दानवे यांच्याकडे आहे. मात्र, नगरपंचायतीच्या कारभारात महिला नेतृत्वाला त्रास होत असेल तर त्यांच्यामागे उभे राहायले हवे, हा संदेश पवारांनी आवर्जून दिला. या भेटीच्या अनुषंगाने बोलताना लहाने म्हणाले, एवढ्या छोट्या कार्यकर्त्याची शरद पवार यांनी घेतलेली भेट म्हणजे मोठे पारितोषक मिळाल्यासारखे वाटते. आयुष्यभर शरद पवार यांच्या विचारावर आता काम करीत राहीन. कितीही ‘ऑपरेशन लोटस’ झाले तरी आता फरक पडू शकणार नाही, असे लहाने म्हणाल्या.