Maharashtra Top Political News : हिंगोलीत शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र लवकरच ४ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली… फक्त विमानांची उड्डाण थांबून अजितदादा पवार परत येणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित करीत आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला इशारा दिला… मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली… जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका संपताच शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले असून विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपात लवकरच ४ हजार जणांचा प्रवेश
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपताच राज्यात पुन्हा पक्षांतराला वेग आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हिंगोली जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिष दांडेगावकर आपल्या चार हजार समर्थकांसह लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे. या पक्षबदलामुळे हिंगोलीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. आतिष दांडेगावकर यांनी बुधवारी हिंगोलीत मोठे शक्तीप्रदर्शन केले. सुमारे ३०० हून अधिक गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. बड्या नेत्याच्या पुत्राने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
मनोज जरांगे यांचा महायुतीला इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याच्या मुद्यावरून जरांगे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. आवश्यकता भासली तर आपली मागणी पूर्ण होण्यासाठी मराठा समाज मुंबईला जाईल, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेझिटियर संदर्भात शासन निर्णय काढला आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी होते. या निर्णयानुसार अर्ज आणि स्थानिक चौकशी अहवाल येऊनही कुणबी प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत? असा प्रश्न जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मंत्री विखे यांच्यावर मराठा समाजाने विश्वास दाखविलेला असून त्यांनी तो सार्थ ठरवावा. प्रमाणपत्रे मिळण्याच्या संदर्भातील मागणीसाठी आता येत्या जूनपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर उपोषणास बसलो तर एकाही मंत्र्यांचे आपण ऐकणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
आणखी वाचा : कोण आहेत उदय भानू चिब? युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक का झाली? कारण काय?
अमोल मिटकरी यांचा डीजीसीएला इशारा
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मोठी कारवाई केली. व्हीएसआर व्हेंचर्स या विमान कंपनीची चार विमाने ग्राऊंड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. फक्त विमानांची उड्डाण थांबून अजितदादा पवार परत येणार आहेत का? अजितदादा गेल्यानंतर डीजीसीएला यातल्या चुका दिसल्या का? विमान अपघात होऊन अजितदादांचा जीव तुमच्या याच चुकांमुळे गेला आहे,’ असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला. आमचा हा लढा इथेच थांबणार नाही. आता कारवाई झाल्या नाहीत तर अजितदादांवर जीव ओवाळणारा कार्यकर्ता आवरल्या जाणार नाही. लढा इथून सुरू झाला. सत्यमेव जयते, असे मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज पठण
मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. ‘आत्ता मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज’ असे कॅप्शन देत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. महापालिका कर्मचारी आणि नागरिकांद्वारे महापालिका वीज विभाग कार्यालयात, जाहीररित्या नमाज पठण करण्यात आले. पालिका आणि पोलिसांनी हे मान्य केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी ह्या संबंधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या प्रकरणामुळे मालेगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : शिंदे गटातील बड्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपापासून सावध राहण्याचा ठाकरेंचा सल्ला, वाचा ५ घडामोडी…
शिवसेना शिंदे गटात पुन्हा इनकमिंग सुरू
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका संपताच शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले असून विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि मनसे पक्षाचे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काल भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
