Shashi Tharoor on TVK and India Alliance : केरळमध्ये सत्ताविरोधी लाटेच्या जोरावर काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) १४० पैकी शंभरच्या आसपास जागा जिंकत परिवर्तन घडवले. त्यात एकट्या काँग्रेसला जवळपास ६३ जागा मिळाल्या. त्यापाठोपाठ डाव्या लोकशाही आघाडीतील (एलडीएफ) प्रमुख घटक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला केवळ २६ जागांवरच विजय मिळवला, तर दोन आघाड्यांच्या राजकारणात राज्यात स्थान निर्माण करू पाहणार्या भाजपाला तीन जागांवरच समाधान मानावे लागले. या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसचे तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. केरळमधील या ऐतिहासिक विजयाचे महत्व, मुख्यमंत्री निवडीबाबतची पक्षाची भूमिका आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी या मुलाखतीत भाष्य केले, त्याविषयी…
केरळचा पुढीलच मुख्यमंत्री कोण? शशी थरूर काय म्हणाले?
केरळमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यावर भाष्य करताना खासदार शशी थरूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबाबत विचारले असता थरूर म्हणाले की, केरळ काँग्रेसमध्ये गुणवत्तेची आणि अनुभवी नेत्यांची कमतरता नाही. आमच्याकडे असे अनेक दिग्गज नेते आहेत, ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असलेला अनुभव, ज्येष्ठता आणि राजकीय वारसा आहे. त्यामुळे एका शब्दांत या प्रश्नाचे उत्तर देणे कोणालाही शक्य नाही. नवनिर्वाचित आमदार आणि पक्ष नेतृत्वामध्ये चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. कदाचित उद्यापासूनच (बुधवार) पक्षश्रेष्ठी निवडून आलेल्या आमदारांशी सल्लामसलत करतील. आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय जलद गतीने पूर्ण होईल, याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री निवडीचा हा विषय विनाकारण लांबवण्याचा पक्षाचा कोणताही विचार नाही. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, असेही थरूर यांनी स्पष्ट केले.
प्रश्न : मुख्यमंत्रीपदासाठी अनेक प्रबळ दावेदार असणे ही बाब काँग्रेससाठी अडचण ठरू शकते का?
थरूर म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना पक्षाला विविध घटकांचा विचार करावा लागतो. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल, त्यानंतर ज्यांची नावे मागे पडतील, त्यांच्याशी योग्य संवाद साधला जाईल, अशी मला खात्री आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे जाणे ही आमची प्राथमिकता असेल. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दाखवलेली एकजूट ही सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे थरूर यांनी नमूद केले. ते म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची एकता खरोखरच प्रभावी होती. ज्यांना उमेदवारी नाकारली गेली किंवा ज्या खासदारांना विधानसभा लढवायची होती, त्या सर्वांनी वैयक्तिक इच्छा बाजूला ठेवून अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला. हे पक्षीय एकजुटीचे एक अद्भूत उदाहरण होते. निवडणुकीच्या प्रचारात जशी शिस्त आणि एकजूट दिसली, तशीच मुख्यमंत्री निवडीनंतरही पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रश्न : केरळमध्ये काँग्रेसला इतका अभूतपूर्व विजय मिळेल, याची तुम्ही अपेक्षा केली होती का?
राज्यात काँग्रेसप्रणीत आघाडीला मिळालेल्या प्रचंड विजयाबाबत पक्षातील अनेकांनाही अंदाजही नव्हता, असे खासदार शशी थरूर यांनी सांगितले. “हा निकाल ऐतिहासिक असून १०० पेक्षा जास्त जागा जिंकणे म्हणजे चमत्कारच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कौल मिळाल्यानंतर जनतेचा संदेश स्पष्ट असतो- हे राज्य तुमच्या हातात घ्या आणि त्यात आमूलाग्र बदल घडवा, असे थरूर म्हणाले. विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी हा अंदाज वर्तवला होता, हेही त्यांनी मान्य केले. यादरम्यान इतर राज्यांतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत फारशी सकारात्मक चिन्हे नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने यंदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करीत १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला. मात्र, स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यानंतर या पक्षाने काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला. त्याबाबत विचारले असता, टीव्हीकेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज भासणार आहे. तमिळनाडूत ‘इंडिया’ आघाडीचे अस्तित्व असून काँग्रेसकडे पाच आणि इतर मित्रपक्षांच्या प्रत्येकी दोन जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी टीव्हीकेने पाठिंबा मागितल्यास त्यावर नक्कीच विचार होऊ शकतो, असे थरूर यांनी स्पष्ट केले.
प्रश्न : अनेक राज्यात सत्तांतराचा व्यापक ट्रेंड दिसतो आहे का?
सरकारे बदलण्याच्या वाढत्या ट्रेंडवर भाष्य करताना थरूर म्हणाले की, मागील निवडणुका कोविड काळानंतर लगेच झाल्या होत्या. त्यावेळी लोकांना बदलापेक्षा स्थिरतेची अधिक गरज वाटत होती. मात्र, आज ती परिस्थिती नाही. जनतेने सध्याच्या सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन असून अनेक पक्ष अपेक्षांत उतरण्यात अपयशी ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये यूडीएफची सत्ता आल्यास विशिष्ट समुदायांच्या किंवा हितसंबंधी गटांच्या दबावाखाली सरकार काम करेल, अशी टीका विरोधकांकडून प्रचारादरम्यान केली जात होती. त्याला प्रत्युत्तर देताना थरूर यांनी राजकीय गणिताचा आधार घेतला. “केंद्रातील भाजपाच्या स्थितीप्रमाणेच आमची स्थिती आहे. जेव्हा आघाडीतील मुख्य पक्ष प्रचंड बहुमताने निवडून येतो, तेव्हा मित्रपक्ष अटी लादण्याच्या स्थितीत नसतात. काँग्रेसकडे आज स्वतःचे इतके भक्कम संख्याबळ आहे की कोणीही आम्हाला ‘ओलीस’ धरू शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, केरळमध्ये बहुमतासाठी आम्हाला ७१ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे स्वतःचे आकडे इतके प्रभावी आहेत की, पक्षाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या कोणत्याही धोरणात्मक निर्णयावर आम्ही ठाम राहू शकतो. त्यामुळे दबावाखाली काम करण्याच्या आरोपात कोणतेही तथ्य उरत नाही.
प्रश्न : केरळच्या आर्थिक स्थितीचे काय? तेच काँग्रेससाठी निर्णायक आव्हान ठरेल का?
राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य थरूर म्हणाले की, आर्थिक संकटावर मात करणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. सध्या हे राज्य केवळ मद्य उत्पादन शुल्क, परदेशातून येणारा पैसा आणि लॉटरीच्या उत्पन्नावर जगत आहे. कोणत्याही सरकारला दीर्घकाळ चालवण्यासाठी हा आधार पुरेसा नाही. सप्टेंबर महिना येईपर्यंत राज्याची तिजोरी रिकामी होते आणि कर्मचाऱ्यांना पगार तसेच बोनस देण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागते, ही खेदजनक बाब आहे. थरूर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील १९९१ च्या ऐतिहासिक बदलांचा संदर्भ देत सांगितले की, केरळच्या अर्थव्यवस्थेत आता १९९१ सारख्या क्रांतीची गरज आहे. आपल्याला उत्पन्नाचे खरे स्रोत शोधावे लागतील. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे काळाची गरज आहे. राज्यातील तरुण वर्गाच्या समस्येकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, काश्मीरनंतर भारतात तरुणांच्या बेरोजगारीचे सर्वाधिक प्रमाण केरळमध्ये आहे. त्यामुळेच आमचा सुशिक्षित तरुण वर्ग इतर राज्यांत किंवा आखाती देशांत स्थलांतर करत आहे. इतकी प्रतिभा आणि सुशिक्षित मनुष्यबळ असूनही आमचे राज्य प्रगती पथावर असायला हवे होते; पण दुर्दैवाने तसे घडले नाही. आम्हाला आता रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल.
प्रश्न : तमिळनाडूतील निकालानंतर अभिनेता विजय यांच्या पक्षाला ‘इंडिया’ आघाडीत स्थान मिळणार का?
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ आघाडीची स्थिती काय असेल, यावर भाष्य करताना शशी थरूर यांनी सकारात्मकता व्यक्त केली आहे. या निकालांमुळे आघाडीला नवी उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केरळमधील या विजयाचा सकारात्मक परिणाम पंजाबमधील आगामी राजकीय वातावरणावरही दिसून येईल. हा विजय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण आघाडीसाठी ऊर्जेचा स्रोत ठरेल. त्याचवेळी, भाजपाही पश्चिम बंगाल आणि आसाममधील कामगिरीनंतर आत्मविश्वासाने पुढे येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. तमिळनाडूतील निकालानंतर अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाला ‘इंडिया’ आघाडीत स्थान मिळणार का? यावर थरूर यांनी सूचक विधान केले. विजय यांना ‘इंडिया’ आघाडीत सामील होण्यासाठी निमंत्रण दिले जाऊ शकते. त्यांना आघाडीतून वगळण्यात आलेले नाही. राजकारणात सर्व शक्यता खुल्या असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात ‘इंडिया’ आघाडी आपला विस्तार करण्यासाठी नवीन मित्रपक्षांना सोबत घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
