Shashi Tharoor Veer Savarkar Award Controversy : काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सोमवारी ‘एचआरडीएस इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने त्यांना ‘वीर सावकर’ पुरस्कार देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले. यानंतर थरूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नकारानंतर संस्थेने थरूर यांना या पुरस्काराची आधीपासूनच माहिती असल्याचा दावा केला. यापार्श्वभूमीवर कोण काय म्हणाले? त्याविषयीचा हा आढावा…
‘एचआरडीएस इंडिया’ ही देशातील सर्वात अग्रगण्य स्वयंसेवी संस्थांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर तशी माहिती देण्यात आलेली आहे. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’साठी एकूण सहा जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यातून ‘एचआरडीएस इंडिया’ने शशी थरूर यांच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा केली. या घोषणेनंतर काही तासांतच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने आपली भूमिका स्पष्ट करीत पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
शशी थरूर नेमके काय म्हणाले?
‘वीर सावरकर’ पुरस्कारासाठी माझे नाव घोषित करण्यापूर्वी संस्थेने माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. त्यांनी माझी संमती घेणे आवश्यक होते. माझ्या परवानगीशिवाय जाहीर केलेल्या या पुरस्काराचा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही, असे थरूर यांनी स्पष्ट केले. बुधवारी तिरुवनंतपुरम येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना थरूर म्हणाले, “या पुरस्काराबद्दल मला काहीच माहिती नसल्याचे मी आधीच स्पष्ट केलेले आहे. माझी संमती नसताना आयोजकांनी माझे नाव जाहीर करणे ही अत्यंत गैरजबाबदारपणाची बाब आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्यास तसेच कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचा प्रश्नच येत नाही”. काँग्रेस पक्ष सातत्याने सावरकरांच्या विचारधारेवर टीका करत असल्याने, थरूर यांना हा पुरस्कार जाहीर होणे आणि त्यानंतर त्यांनी तो त्वरित नाकारणे, याकडे अनेक राजकीय निरीक्षक ‘विचारधारेची स्पष्ट भूमिका’ म्हणून पाहत आहेत.
आणखी वाचा : अण्णा हजारेंचा फडणवीसांना इशारा; भाजपात तीव्र मतभेद, शिंदेंचे आमदार नाराज? वाचा ५ घडामोडी…
स्वयंसेवी संस्थेचा नेमका दावा काय?
यादरम्यान दी इंडियन एक्स्प्रेसने एचआरडीएस इंडियाचे संस्थापक सचिव अजी कृष्णन यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतली. आम्ही शशी थरूर यांना पुरस्काराविषयी एका महिन्याआधीच माहिती दिली होती. त्यासाठी संस्थेतील सदस्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले होते. तसेच दोन आठवड्यांपूर्वी आमचे संस्थेचे चेअरमन, निवृत्त आयएएस अधिकारी रवी कांत यांनीही थरूर यांच्याशी चर्चा केली होती, असा दावा कृष्णन यांनी केला आहे. सावरकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे इतर मानकरी कोण याबाबतची माहिती थरूर यांना देण्यात आली होती. त्यावेळी कोणताही वाद नव्हता आणि त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास तसेच पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती. आता ते ‘वीर सावकर’ पुरस्कार स्वीकारण्यास नकार देत आहे. कदाचित काँग्रेसकडून त्यांच्यावर दबाव आला असेल, असेही कृष्णन म्हणाले.
पुरस्कारासाठी थरूर यांची निवड का?
‘वीर सावकर’ पुरस्कारासाठी शशी थरूर यांचीच का निवड करण्यात आली असा प्रश्नही दी इंडियन एक्स्प्रेसने कृष्णन यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, थरूर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे विचार नेहमीच प्रभावीपणे मांडले होते. अलीकडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या प्रतिनिधीमंडळात शशी थरूर यांचे नाव समाविष्ट केले होते. त्यावेळी थरूर यांनी अनेक देशांमधून जाऊन भारताने पाकिस्तानवर हल्ला का केला याची भूमिका मांडली होती. त्यांनी नेहमीच राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रीय हित आणि भारताच्या दृष्टीकोनाची बाजू मांडली आहे. ब्रिटिश वसाहतवादाबाबत त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे थरूर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता, असे कृष्णन यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेतील ‘या’ लाभार्थ्यांकडून सरकार पैसे परत घेणार; विधानसभेत आदिती तटकरेंची घोषणा
काँग्रेस आणि थरूर यांच्यात दुरावा?
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेतृत्व आणि शशी थरूर यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेसचे नेते केंद्र सरकारवर टीका करीत असताना थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे कौतुक केले होते. त्यावरून पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या भूमिकेवर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी केंद्र सरकारने थरूर यांना आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. ज्या कार्यक्रमातून विरोधी पक्षनेत्यांना वगळण्यात आले, तिथे उपस्थित राहणाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी ठेवावी. जर मला निमंत्रण असते, तर मी अशा कार्यक्रमाला गेलो नसतो, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले होते.
