महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले… पक्षाचा विस्तार करण्यासाठी सुरू केलेले ‘ऑपरेशन टायगर’ कधीही थांबणार नसल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला… महायुतीने लाडकी बहीण योजनेतील ९२ लाख अपात्र लोकांना प्रत्येकी दीड हजार रुपये वाटून कोट्यवधीचा अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला… उद्धव ठाकरे यांनी किमान दोन पाने तरी रामरक्षा वाचावी, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला… हिंमत असेल तर राम मंदिरावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्यांना रा. स्व संघातून निष्कासित करावे, असे खुले आव्हान काँग्रेसने दिले… आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राला कोण विचारतंय असे म्हणत आम्ही त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवतो, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या महिन्यात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. मात्र, या सहाही खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अद्याप मान्यता दिली नसल्याचे समोर आले. याच मुद्द्याला हाताशी ठाकरे गटाचे संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदारांना पत्र पाठवले. त्यात काही कायदेशीर बाबींचा दाखला देण्यात आला आहे. त्यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राला कोण विचारतंय, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. आम्ही त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवतो, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘ऑपरेशन टायगर’ सुरूच राहणार!

पक्षाचा विस्तार करण्यासाठी सुरू केलेले ‘ऑपरेशन टायगर’ कधीही थांबणार नाही, असा दावा शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केला. आता मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी खासदार आणि माजी आमदार पक्षाच्या रांगेत असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे शिंदेसेनेच्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या बीएलओ व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ऑपरेशन टायगर कधीच थांबणार नाही. आता महानगरपालिकेतील नगरसेवक, महाविकास आघाडीतील आमदार, तसेच त्यांचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दिसतील. शिवसेना पक्ष गडचिरोलीपासून सावंतवाडीपर्यंत वाढतो आहे, असे विधान मंत्री सामंत यांनी केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

लाडकी बहीण योजनेत कोट्यवधींचा अपहार?

महायुतीने लाडकी बहीण योजनेतील ९२ लाख अपात्र लोकांना प्रत्येकी दीड हजार वाटून कोट्यवधीचा अपहार केला, आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ पक्ष आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. बाकी शिंदे गट आणि अजित पवार गट हे अमित शाहांचे पक्ष आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेबाबत राऊत म्हणाले की, १४ हजार कोटी रुपये या योजनेतून वितरित करण्याची बाब समोर आली आहे. जे ९२ लाख बोगस लाभार्थी आहेत, त्यात २९ हजार पुरुष आहेत. कोणतीही केवायसी न करता, कोणतीही छाननी न करता तीन हजार ५१५ कोटी रुपये अशा पद्धतीने उधळले गेले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी फक्त मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा हा अपहार केला आहे. राम मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरणे आणि सरकारी तिजोरी लुटणे हा गुन्हा सारखाच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीत झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उचलून धरला. आठवडाभरापूर्वी त्यांनी या मुद्द्यावरून भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी मुंबईत ‘रामरक्षा’ आंदोलन केले होते. त्यानंतर आता येत्या १८ जुलै रोजी ठाकरेंकडून नागपूरमध्येही अशाच प्रकारचे आंदोलन करणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना सणसणीत टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी किमान दोन पाने तरी रामरक्षा वाचावी… ते रामरक्षा वाचणार असतील आणि त्यांना चालणार असेल तर मीदेखील रामरक्षा म्हणायला तयार आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. मला पूर्ण रामरक्षा पाठ आहे. समजा नसती आली तर किमान वाचता तर आली पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही हे कुठलं आंदोलन आहे? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे रा. स्व संघाला खुले आव्हान

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देगणीत झालेल्या अपहारावरून काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय संवयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. या दरोड्यावर संघाकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. पण नुसती नाराजी व्यक्त करून काहीच फायदा नाही. हिमंत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्कासित करावे, असे खुले आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला मराठवाड्यातील काँग्रेसच्या खासदारांची तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना- हिंमत असेल तर राम मंदिरावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्यांना रा. स्व संघातून निष्कासित करावे, असे खुले आव्हान सपकाळ यांनी दिले आहे.