शाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न |Shinde Fadnavis government try political alliance Chhatrapati sambhajiraje financial support Shahi Dussehra kolhapur | Loksatta

शाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न

शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी पालकमंत्री पद आल्यानंतर कोल्हापूरचा शाही दसरा आणखी थाटात करण्यासाठी राज्य शासन २५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली.

शाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न

दयानंद लिपारे

कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता शासकीय मदतीतून होणार असल्याने या उत्सवाचा थाट आणखी वाढीस लागणार आहे. शाही दसऱ्याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करीत असताना या निमित्ताने राज्य शासनाने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी जवळीकही वाढवली आहे. ती साताऱ्यातील छत्रपती घराण्याप्रमाणे राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरणार का, हे मात्र कालांतराने स्पष्ट होणार आहे.
देशात काही मोजक्याच ठिकाणी शाही दसरा साजरा केला जातो. म्हैसूर, कुल्लू, इंदोर, ग्वाल्हेरमध्ये राजेशाही दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला अडीचशे वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. संस्थान काळात हत्ती, घोडे , उंट , अश्व , सैन्यदल, मानकरी अशी भव्य मिरवणूक निघत असल्याने त्याविषयी प्रजेमध्ये उत्साह होता. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर दसरा उत्सवाचे रूप काहीसे बदलले असले तरी आजही या सोहळ्याचे आकर्षण आहेच.

शाही परंपरेच्या रितीरिवाजाने करवीर संस्थानाचा दसरा सोहळा साजरा केला जात होता. पण आता त्याला शासकीय मदतीचा हातभार लागत आहे. शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी पालकमंत्री पद आल्यानंतर कोल्हापूरचा शाही दसरा आणखी थाटात करण्यासाठी राज्य शासन २५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली. कोल्हापूरचा शाही दसरा देश-विदेशात पोहोचावा, कोल्हापुरात पर्यटकांचा ओढा वाढावा, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी असे काही विकासात्मक हेतूही यामागे आहेत. या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा : लातूर लोकसभेसाठी पुन्हा ‘रेल्वे येईल धावुनी…’चा राजकीय खेळ

छत्रपती घराण्याशी राजकीय जवळीक ?

कोल्हापूरचा शाही दसरा आजवर प्रथा – परंपरेने पार पडत आहे. ‘छत्रपती देवस्थान ट्रस्ट’ शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करून त्याचा अर्थभारही उचलतो. पण यावर्षी राज्य शासनाने स्वतःहून भरभक्कम मदतीचा हात पुढे केला आहे. या माध्यमातून छत्रपती घराण्याशी राजकीय जवळीक साधण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचाही अर्थ काढला जात आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर वर्णी लावली होती. नव्याने राज्यसभा सदस्य निवडीची वेळ आली तेव्हा भाजपने त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला नव्हता. संभाजीराजे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा रागरंग होता. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाकडून निवडणूक लढवावी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव नाकारून संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन केली. पण पुढे त्यांनी या निवडणुकीतूनच अंग काढून घेतले. स्वराज्य संघटना राजकारणात उतरणार का याची चर्चा असताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आधी ‘ माविआ’ तर अलीकडे विद्यमान राज्य शासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

संभाजीराजे आणि सत्ताधारी वरिष्ठ नेते यांच्या भेटीतील कथित विलंब यावरूनही मराठा समाजात जोरदार चर्चा असते. तर इकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीवेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसच्या प्रचारात भाग घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार असतील असे बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यातील उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले हे भाजपच्या छावणीत दाखल झाले आहेत. आता कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संभाजीराजे व मालोजी राजे यांच्याशी जवळीक साधण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हालचाली आहेत. त्याची सुरुवात म्हणून शाही दसऱ्याला मदत केली जात असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’

छत्रपती घराण्याचा प्रतिसाद

दरवर्षी होणाऱ्या राजेशाही दसरा महोत्सवामध्ये बदल न करता हा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक, अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. त्याला प्रतिसाद देत श्रीमंत श्री शाहू महाराज छत्रपती यांनी यावर्षी भव्य स्वरूपात साजरा होणाऱ्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने पुढील वर्षी कोल्हापूर संस्थांनाचा शाही दसरा हा राज्य, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्या इतपत मोठ्या कल्पकतेने साजरा केला जाईल. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला बळ मिळेल, असा विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला युवराज मालोजीराजे यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 12:32 IST
Next Story
पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’