लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सध्या राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या प्रचारात तसेच पक्षाच्या समाजमाध्यमावर योजनेचा प्रचार करताना ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळून या योजनेचा ‘दादांचा वादा’ असा प्रचार केला जात आहे. शिंदे गटाने पवार गटाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

या योजनेसाठी दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यातील दोन कोटी २२ लाख महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा झाले आहेत. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता आता महायुतीत त्याच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना मुख्यमंत्री विभागाकडून राबविल्या जात असल्याने अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला विकास विभागात धुसफूस आहे. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद आहे. महिला वर्गाला योजनेचे महत्त्व पटवून देताना हा ‘दादाचा वादा’ असल्याचा प्रचार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करीत आहेत. यात्रेत होणाऱ्या प्रचारात महायुतीच्या इतर नेत्यांची छायाचित्रे वापरली जात नाहीत. अजित पवार गटाच्या या प्रचारावर शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार नरेश म्हस्के यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीनंतर माझी बहीण ही माझी लाडकी आहे, हे दाखवण्यासाठी दादांनी असा प्रचार सुरू केला असावा असे वाटते. त्यांनी प्रचारातून ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळला म्हणून या योजनेचे नामांतर होत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानेच कायम राहणार आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.