पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेनेला केवळ हडपसर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शिवसेनेच्या आढावा बैठकीत चाचपणी करण्यात आली असून, शिवसेनेचे खासदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे गणपतीनंतर लगेच पुणे दौरा करणार आहेत. त्यामुळे तीन जागांची आस बाळगून असलेल्या शिवसेनेला प्रत्यक्षात किती जागा मिळतात याची उत्सुकता असेल.
शिवसेनेने शहरातील हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघ घ्यावेत, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र, या तीन जागांऐवजी केवळ हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने शिवसेनेचे सचिव संजय मालशेकर यांनी शहरात आढावा घेतला. त्या वेळी हडपसर विधानसभा मतदारसंघात तयारी करण्याची सूचनाही त्यांनी केली.

आगामी निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून लढणार आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, तो मतदारसंघ त्या पक्षाला, असे प्राथमिक सूत्र निश्चित करण्यात आले आहे. वडगावशेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, तर कसब्यासह शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे. शिवसेनेचा शहरात सध्या एकही आमदार नाही.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
thackeray group strategy against mp sandipan bhumre dominance in paithan
पैठणमध्ये भूमरे यांच्या वर्चस्वाला शह देण्याची ठाकरे गटाची खेळी
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
western Maharashtra vidhan sabha
पश्चिम महाराष्ट्रात मविआची मुसंडी?
Devendra Fadnavis Political Future
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण असणार? मुख्यमंत्रिपद कोणाला? शरद पवारांकडून सर्व प्रश्नांची उत्तरं

हेही वाचा >>>Arvind Kejriwal Resignation: दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, केजरीवाल राजीनामा देणार; आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती?

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. खडकवासल्यात सध्या भाजपचा आमदार असूनही तो राष्ट्रवादी काँग्रेसला, तर वडगावशेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असूनही तो भाजपकडे जाईल, अशी चर्चा सुरू आहे. वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची पोर्श अपघात प्रकरणात चौकशी झाल्याची चर्चा असल्याने, त्यांना उमेदवारी न देता ती जागा भाजपकडे जाईल आणि तेथून जगदीश मुळीक लढण्यास इच्छुक असतील. खडकवासल्यात सध्या भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार असले, तरी त्यांच्यासाठी निवडणूक अवघड असल्याची कुजबूज भाजपमध्येच असल्याने ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाईल, अशी शक्यता आहे.

या सगळ्या समीकरणांत शिवसेनेला हडपसर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तेथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे सहजासहजी ही जागा सोडतील, असे नाही. अर्थात, पक्षनेतृत्वाने ठरविल्यास त्यांना या वेळी माघार घ्यावी लागू शकते. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांची हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच या जागेसाठी आग्रह धरला आहे.

हेही वाचा >>>कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?

शिवसेना जिल्हा प्रमुखांवर कारवाईचे संकेत

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत शिवसेनेच्या बैठकीत देण्यात आले असून कारवाई करून महायुतीमधील वाद टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी बारामती येथे ‘गणेश फेस्टिव्हल’चे आयोजन केले होते. महोत्सवांतर्गत शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टाॅलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट द्यावी, असा जेवरे यांचा आग्रह होता. मात्र, महोत्सवाला पवार अनुपस्थित राहिले. त्यामुळे नाराज जेवरे यांनी भिगवण चौकातील अजित पवार यांच्या फलकावरील छायाचित्राला काळे कापड लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बारामतीमध्ये महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन महायुतीमधील धुसफूस पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मतदारसंघ आढावा बैठकीवेळी यासंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी जेवरे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जेवरे यांची यापूर्वीच जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी काढून घेतली आहे. त्यांच्यावर आता पक्षाअंतर्गत कारवाई केली जाईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.