आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ न्यायालयीन खटल्यात अडकल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… महायुती सरकारवर टीका केल्यामुळेच आपल्याला ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला… जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यामुळेच देशात इंधन टंचाई निर्माण झाली असेल, असा टोला काँग्रेसच्या नेत्याने भाजपाला लगावला… जिथे शक्य तिथे बिब्बा घालण्याचा जयंत पाटलांचा इतिहास असल्याची टीका भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली… आमदार रोहित पवार यांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी एका एजन्सीला पाच कोटींचे पॅकेज दिल्याचा आरोप अजित पवार गटातील नेत्याने केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेंच्या शिलेदाराची आमदारकी धोक्यात?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ न्यायालयीन खटल्यात अडकल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची याचिका फेटाळून लावण्यासाठी आमदार खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावत थोरात यांची याचिका स्वीकारली आहे. संगमनेर विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर थोरात यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. खताळ यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत आणि कर थकबाकी जाहीर केलेली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. त्यांच्या या याचिकेविरोधात खताळ यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्याने लवकरच या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. या खटल्यात जर दोषी आढळल्यास लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खताळ यांची आमदारकी रद्द होऊ शकते, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आणखी वाचा : Jaykumar Rawal : खरात प्रकरणात भाजपा मंत्र्याच्या चौकशीची का होतेय मागणी? कारण काय?
राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी पाच कोटींचे पॅकेज?
आमदार रोहित पवार यांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी एका एजन्सीला पाच कोटींचे पॅकेज दिल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. माध्यमांशी संवाद साधताना सूरज चव्हाण म्हणाले की, रोहित पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना खोटा आरोप करण्यासाठी आमच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी काही नेमणुका केल्या आहेत. ते पदाधिकारी सातत्याने आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं काम करतात. आमच्या पक्षात फूट कशी पडेल, भांडणे कशी लागतील याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या एका प्रवक्त्यांनी पक्षाच्या संविधानातून काही माहिती वगळल्याची अर्धवट माहिती दिली; परंतु आमच्या पक्षात सेवा दल, ओबीसी सेल हे कधीही फ्रन्टलमध्ये नव्हते. ते सेल म्हणून पक्षात कार्यरत होते, असेही चव्हाण म्हणाले.
इंधन टंचाईवरून काँग्रेसचा भाजपाला टोला
राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभी आहे. महामार्गावरील अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत; पण सत्ताधाऱ्यांची बनवाबनवी अजूनही सुरूच असून ही इंधन टंचाई पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधींमुळेच झाली असेल, असा उपरोधिक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपाला लगावला. इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाली असताना भाजपाने या स्थितीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. त्याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडताना भाजपाला लाज वाटत नाही. पाप तुमचे आणि खापर काँग्रेसवर? राहुल गांधीचे नाव भाजपाला घ्यायचे असेल तर हा तुटवडा पण पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांच्यामुळेच झाला, भाजपाची ही जुनी टेप आहे. लोकांच्या चुली विझवून कसले नवीन जुमले देत आहेत? जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, उत्तरे द्या, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
एकनाथ खडसेंचा भाजपावर गंभीर आरोप
महायुती सरकारवर टीका केल्यामुळेच आपल्याला ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्यावर जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जमीन खरेदी प्रकरणात आपला वैयक्तिक कोणताही संबंध नाही. तसेच मुलीने खरेदी केलेली जमीन महार वतन नाही तर वर्ग एक प्रकारातील आहे. खुद्द महसूल मंत्र्यांनी विधिमंडळात त्या बाबतचे स्पष्टीकरण दिल्याचा दावा आमदार खडसे यांनी कागदपत्रांसह केला. आपण यापूर्वी मुक्ताईनगरातील उपसा योजनेच्या भंगार चोरी प्रकरणासह सावद्यातील मुरुम चोरी प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी आजतायागत संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, २४ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी तत्परता दाखवून पोलीस मध्यरात्री १२ वाजता गुन्हा दाखल करतात, अशी टीकाही त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
जिथे शक्य तिथे बिब्बा घालण्याचा जयंत पाटलांचा इतिहास असल्याची टीका भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत त्यांनी सांगली जिल्हा परिषद सभापती निवडीची रणनीती अंतिम क्षणी निश्चित केली जाईल, असे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघाडीने महायुतीवर मात करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सभापती निवडीवेळी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंनी ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुधवारी विषय समितीच्या चार सभापतींची निवड केली जाणार असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपले सदस्य सहलीवर धाडले आहे. यादरम्यान महायुतीचीही सभापती निवडीसाठी रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना लक्ष्य केले.
