आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिंदे सेनेत खांदेपालट होणार असून काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली… भोंदू अशोक खरातच्या संस्थेला शासकीय निधी दिल्याप्रकरणी मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी माजी आमदाराने केली… उद्धव ठाकरे यांची साथ सोडून काँग्रेसच्या प्रवेशाबाबतच्या चर्चेबद्दल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले… अशोक खरातला जवळजवळ ३९ आमदार खरातला भेटून गेले; मग मलाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न दीपक केसरकर यांनी उपस्थित केला… अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची दलालाची भूमिका असल्याचा आरोप करत त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच खांदेपालट?

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे. अधिवेशनानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपदावरून डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे वृत्त टीव्ही नाईन मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अधिवेशन काळात काही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पत्र दिले होते. या पत्रात स्वपक्षीय मंत्र्यांबरोबर अनेक आमदारांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर स्वपक्षीय मंत्र्यांशिवाय आम्हाला तुमची भेट घ्यायची असल्याची इच्छाही त्यांनी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान अधिवेशन संपल्यानंतर शिंदे सेनेत खरंच खांदेपालट होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपा मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी

भोंदू अशोक खरात याच्या संस्थेला शासनाकडून निधी दिल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि मंत्री जयकुमार रावल यांना सहआरोपी करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत झालेल्या चर्चेत अशोक खरात यांचे उद्योग २००३-०४ पासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. २०१४ ते २०२४ या कालावधीत गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यांच्या कार्यकाळात पर्यटन विभागामार्फत जयकुमार रावल यांच्या अधिपत्याखाली खरात यांच्या खाजगी संस्थेला सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : सुषमा अंधारे-शीतल म्हात्रे यांच्यात कशामुळे जुंपली? अशोक खरातच्या पाण्याचे प्रकरण काय?

ठाकरे गट सोडण्याच्या चर्चेवर राऊतांचे स्पष्टीकरण

खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. ठाकरे गटात सध्या दुफळी माजली असून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे दोन गट पडले आहेत. राज्यसभेच्या खासदारकीसाठी राऊत यांना काँग्रेसच्या मदतीची गरज आहे, असेही ते म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्यात आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? या अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत. या पक्षात मी खासदार व्हायला आलो नसून अनेक वर्षे शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. त्यामुळे काहीही झाले तरीही माझ्या मनात शिवसेना सोडण्याचा विचार कधीच शिवला नाही, असे स्पष्ट करीत संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

खरात प्रकरणावर दीपक केसरकर काय म्हणाले?

महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही. या मंदिराच्या विश्वस्तांचीदेखील सविस्तर चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिंदे सेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली. अशोक खरातला जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले; मग मलाच का लक्ष्य केले जात आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भोंदू खरातच्या दुष्कृत्याबाबत मला माहीत नव्हते, मी धार्मिक असल्याने त्या मंदिरात गेलो होतो. खरातने मंदिराच्या आडून केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना त्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्यांनाही या भोंदूची अजिबात कल्पना नव्हती, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Ajit Pawar Case : झिरो एफआयआर कसा नोंदवला जातो? रोहित पवारांनी कर्नाटक पोलिसांत का नोंदवली तक्रार? कारण काय?

रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या दलाल म्हणून कार्यरत होत्या. पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती समाज माध्यमात येत असतांना या प्रकरणात अडकलेल्या चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी केली. महिला आयोगाकडे तक्रारी दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलांना तुमचे ग्रह, तारे बघितले का, पत्रिका पाहिली का, अशी विचारणा करुन चाकणकर खरात याच्याकडे पाठवत होत्या, असा आरोपही त्यांनी केला. खरात प्रकरणात ठोंबरे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीनंतर ठोंबरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.