आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदे गटाचे सिंधुदुर्ग येथील जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… चंद्रपूरच्या महापौरपदी संगीता खांडेकर विराजमान झाल्यानंतर भाजपातील दोन गटातला वाद विकोपाला गेला असून पक्षात बहिष्कार नाट्य रंगले… सभागृहात पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका न घेणाऱ्या कल्याणमधील तीन नगरसेवकांवर ठाकरे गटाकडून निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली…. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला… नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या प्रश्नावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक संपताच शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर उफाळून आला. सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पक्षासाठी जीव तोडून काम केल्यानंतरही वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत असतील तर आपण कुठेतरी कमी पडत असल्याचे मला वाटते आहे. त्यामुळे कोणावरही रोष न ठेवता मी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत आहे. यानंतर आपण शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचे वालावलकर यांनी स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. वालावलकर हे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात. सध्या शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी सुरू असून ते राजीनामा मागे घेणार का? याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे.

भाजपातील दोन गटांत टोकाचे वाद

काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर महापालिकेत भाजपाने ठाकरे गटाच्या मदतीने सत्तास्थापन केली. यानंतर महापौरपदी संगीता खांडेकर यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली. यादरम्यान भाजपाच्या दोन गटांत टोकाचे वाद होत असल्याचे समोर आले आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वादामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. भाजपाच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला जायचे नाही आणि त्यांना निमंत्रितही करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यात चित्रफितींच्या माध्यमातून ‘सोशल मिडिया वॉर’ रंगल्याने त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही एकमेकांशी भांडताना दिसून येत आहेत. या भांडणामुळे जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप भाजपाच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला आहे.

आणखी वाचा : बांगलादेशच्या निवडणुकीत विजय मिळवणारे हिंदू उमेदवार कोण? त्यांनी कोणाचा पराभव केला?

ठाकरे गटाचे नगरसेवक पक्षावर रूसलेलेच?

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे- राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि मधुर म्हात्रे हे तीन नगरसेवक अचानक बेपत्ता झाले होते. त्यासंदर्भात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. यादरम्यान शुक्रवारी या तिन्ही नगरसेवकांनी अचानक नवी मुंबईत कोकण विभागीय कार्यालयात जाऊन नगरसेवक पदाची स्वतंत्रपणे नोंदणी केली. मशाल चिन्हावर निवडून येऊनही हे तिन्ही नगरसेवक ठाकरे गटात सहभागी होण्यास तयार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तिन्ही नगरसेवकांची भूमिका पाहून त्यांना अपात्र ठरावा, आम्ही त्या प्रभागातील पोटनिवडणुकीत पुन्हा पक्षाचे नगरसेवक निवडून आणतो, अशी भूमिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे नगरसेवकांचे निलंबन होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फडणवीसांचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर संताप

मालेगाव महापालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा फोटो दालनातून काढून टाकण्यात आला. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे- हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

हेही वाचा : भाजपाला फटका देण्याची शिंदे गटाची तयारी? ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

गणेश नाईक यांची शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या प्रश्नावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. जनतेच्या प्रश्नांवर बोलू शकलो नाही तर मंत्रिपद काय चाटायचे का? असा संतप्त सवालही त्यांनी वाशी येथील एका कार्यक्रमातून उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याकडे त्यांनी बोट दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी विशेषतः रुग्णालय आणि सार्वजनिक उद्यानांसाठी काही भूखंडांची मागणी करण्यात आली होती. मात्र हे भूखंड सार्वजनिक उपयोगाऐवजी खासगी विकासकांच्या फायद्यासाठी वळवण्यात आल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक त्यांनी केला आहे. नवी मुंबईकरांचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम झाले. दलालांमार्फत हे प्रकार घडले. ज्या मंत्रिमंडळात मी आहे, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने अशी कृत्ये केली, याची मला लाज वाटते, असा संताप नाईक यांनी व्यक्त केला आहे.