आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्ट संदर्भात शिंदे गटातील एका बड्या नेत्याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली… रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांनी केला… कर्नाटकात भाजपाचे सरकार नसल्याने तिथे आम्हाला न्याय मिळाला, असा टोला शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी लगावला… अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी त्यांच्या पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला…अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केल्यास डझनभर मंत्री जेलमध्ये जातील, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदे गटातील बडा नेता गोत्यात?

भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील तपासाला आणखीनच वेग दिला आहे. अशोक खरातच्या नाशिक येथील शिवनिका ट्रस्टमध्ये सदस्य असलेले शिंदे सेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांचीदेखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे. टीव्ही नाईन मराठीने सूत्रांच्या हवाल्याने त्या संदर्भातील वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत अशोक खरात याच्या कारनाम्यांचा पाढा वाचून दाखवला होता. तसेच या प्रकरणात ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल, त्यालाही सोडले जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यादरम्यान खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये सदस्य असलेल्या केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप

रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. कुंपनच शेत खाते असे आपण ऐकले होते; पण इथे कुंपणच अख्खे शेत लांडग्यापुढे टाकत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कुठल्याही महिलेल्या आपल्या वाटल्या नाहीत, त्यांची उठबस नेहमीच मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये असायची, असेही आशा मिरगे म्हणाल्या. शिंदे सेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातचे पार्टनर असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आणखी वाचा : BJP-Shinde Sena : भाजपा-शिंदे सेनेत वाद का पेटला? मंत्र्यांच्या राजीनाम्याची तयारी नेमकी कशासाठी?

युगेंद्र पवारांचा भाजपाला टोला

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कर्नाटकच्या बंगळुरू शहरात’झिरो एफआयआर’ दाखल झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. कर्नाटकात भाजपाचे नव्हे तर काँग्रेसचे सरकार असल्याने तिथे आम्हाला न्याय मिळाला, असा टोला युगेंद्र यांनी लगावला. तिथल्या प्रशासनाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ‘झिरो एफआयआर’ दाखल केला, त्याबद्दल मी कर्नाटक सरकारचे आभार मानतो. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवारांचा गंभीर आरोप

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी त्यांच्या पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या १८व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल , सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले होते. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजे प्रफुल पटेलांना देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते, असा दावा रोहित यांनी केला. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली असावी, असेही रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे गटाच्या दाव्याने महायुतीत खळबळ; शिंदे सेनेच्या मंत्र्यांची राजीनाम्याची तयारी? वाचा ५ घडामोडी…

खरात प्रकरणात डझनभर मंत्र्यांचा सहभाग?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक दावा केला. महायुती सरकारने भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केल्यास डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असे सपकाळ म्हणाले. अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. एवढेच नाही तर मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होतेय त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.