आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, असा खळबळजनक दावा ठाकरे गटातील नेत्याने केला… महायुतीतील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचला असून शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली… अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा पुरेसा नसून त्यांना सहआरोपी करून गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली… शरद पवार गटाचे दिग्गज नेते जयंत पाटील यांनी भाजपात जाण्यासाठी अनेक उंबरठे झिजवल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला… अशोक खरात प्रकरणात ज्याचा दुरान्वये संबंध असेल त्यालाही सोडले जाणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरे गटाच्या दाव्याने महायुतीत खळबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, अशोक खरात यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोटो असल्याचेही समोर आले आहे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबरही खरातचे संबंध असल्याचे दिसून येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे खरातबरोबर विधी करताना पाटावर बसले होते आणि करंगळीने पाणी सोडत होते. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट प्रश्न विचारत तुमच्या मंत्रिमंडळातील जे भगतगण आहेत, त्यांच्याबाबत तुमची भूमिका काय? असा प्रश्नही उपस्थित केला.
आणखी वाचा : अशोक खरातला पाठिशी घालणारे तीन अधिकारी कोण? विरोधकांचा खळबळजनक आरोप; विधानसभेत काय घडले?
शिंदे सेनेच्या मंत्र्यांची राजीनाम्याची तयारी?
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिंदे गटातील मंत्र्यांनी घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपाकडून सातत्याने होत असलेल्या गळचेपीवर ठोस भूमिका घेतलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिकाही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडल्याचे सांगितले जात आहे.सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजपा आणि शिंदे सेनेतील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले. बहुमत नसतानाही भाजपाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. या निवडणुकीदरम्यान पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत मंत्री शंभुराज देसाई यांना दुखापत झाली. त्याचबरोबर मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबतही पोलिसांची झटापट झाली. यावरून शिंदे गट आक्रमक झाला असून काही मंत्र्यांनी थेट राजीनाम्या देण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणी
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा पुरेसा नसून त्यांना सहआरोपी करून गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. या प्रकरणातील अनेक गोष्टी पुढच्या दोन दिवसानंतर मी स्वतः पुढे आणणार असल्याचे त्यांनी चंद्रपुरात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. अशोक खरात प्रकरणात अनेक लोकांची नावे येण्याची शक्यता आहे. कदाचित ते राजकारणातले, प्रशासनातले असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील. महाराष्ट्रातल्या लोकांच्या इभ्रतेशी खेळायचा जर कोणी प्रयत्न केला असेल तर त्याची गय अजिबात होता कामा नये, असा इशाराही अंधारे यांनी दिला. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट व्हायलाच हवी, तरच सर्व सत्य बाहेर येईल, अशी मागणीही त्यांनी जोरकसपणे मांडली.
जयंत पाटील भाजपात जाणार होते : बड्या नेत्याचा दावा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते. अर्थातच जयंत पाटील यांच्याकडून त्याचे सातत्याने खंडण केले जाते. आपण राष्ट्रवादीतच राहणार असून शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. यादरम्यान अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी कोणा-कोणाचे उंबरे झिजवले याचे आपण साक्षीदार आहोत, असे संजय काका पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : शशी थरूर यांच्या इराण युद्धावरील वक्तव्यांमुळे राजकीय वादंग का उठला? कारण काय?
देवेंद्र फडणवीस खरात प्रकरणावर काय म्हणाले?
अशोक खरात प्रकरणात ज्याचा दुरान्वये संबंध असेल त्यालाही सोडले जाणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. अशोक खरात याने आपल्या कथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि महिलांची दिशाभूल करून त्यांच्यासोबत गैरवर्तन व दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी या दोन्ही बाजूंनी याचे गांभीर्य ओळखावे, असेही ते म्हणाले. अशोक खरात प्रकरणाची चौकशी सखोल सुरू आहे. पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून आरोपीला जाळ्यात अडकवले आहे. यासंदर्भातील सर्व माहिती संकलित करून मी उद्या सभागृहाला अवगत करेन, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय समोर येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
