आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तब्बल ६३ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला… महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कामात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदाराने केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली… राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे नेते गॅस टंचाईबाबत जाणीवपूर्वक लोकांची माथी भडकावत असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली… ॲट्रॉसिटी कायद्यात राज्य सरकारने महत्वाचे बदल केले असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली… अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करीत आमदार अमोल मिटकरी यांनी चौकशी यंत्रणेला पुन्हा लक्ष्य केले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदे गटातील बडा नेता अडचणीत?
रायगडमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. काही महिन्यांपूर्वी खोपोली येथील शिंदे गटाच्या नगसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली होती. या हत्याकांडावरून शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तटकरे रायगडमध्ये सत्तेत आल्यापासून रक्तरंजित राजकारण सुरू झाले असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर यांनीही प्रत्युत्तर देत आमदार थोरवे यांनी आरोप करताना संयम बाळगावा, असा इशारा तटकरे यांनी दिला होता. तरीदेखील थोरवे यांनी आपल्या आरोपींची धार आणखीनच तीव्र केली होती. यादरम्यान तटकरे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून थोरवे यांच्याविरोधात तब्बल ६३ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
महाज्योतीत ५०० कोटींचा घोटाळा?
महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे काम विशिष्ट संस्थेला निविदा प्रक्रिया न काढताच देण्यात आले. त्यामध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. सत्ताधारी पक्षातील एका आमदारानेच घोटाळ्याचे आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र, मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीला २०० कोटी रुपयांचा निधी मिळतो, मग ५०० कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल? असा प्रश्न उपस्थित करत परिणय फुके यांचे आरोप फेटाळून लावले. तरीदेखील संबंधित प्रकाराची विभागीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सावे यांनी विधान परिषदेत दिले. सध्या या प्रकरणाची संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा : ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना कसे लक्ष्य केले? संजय राऊतांच्या टीकेला भाजपाने कसे प्रत्युत्तर दिले?
देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जाणीवपूर्वक गॅस टंचाईबाबत लोकांची माथी भडकावत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशात गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या संभाव्य तुटवड्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केला होता, तर नाना पटोले यांनीही त्यावरून केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केले होते. त्याबाबत नागपुरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक लोकांची माथी भडकावत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेतली असून देशात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल
राज्य सरकारने ॲट्रॉसिटी कायद्यात महत्वाचे बदल केले असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. राजकीय फायद्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप होत आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राजकीय हेवेदावे, राजकीय स्वार्थासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यामुळेच ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे. यादरम्यान ॲट्रॉसिटी कायद्यात महत्वाचे बदल केल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले आहे. कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी तक्रार दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्याचा अहवाल आल्यानंतरच आरोपीला अटक होईल, असे त्यांनी विधान परिदेत सांगितले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाची एवढी भीती का? नेमके काय आहे या विधेयकात?
अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात शंका – कुशंका कायम आहेत. या प्रकरणावर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. शनिवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना मिटकरी यांनी पुन्हा एका चौकशी यंत्रणेला लक्ष्य केले. निदान अजितदादाचे विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज तर महाराष्ट्रासमोर येऊ द्या, नागरी विमान उड्डाण मंत्रालयाचा अंतिम अहवाल व ब्लॅक बॉक्स डेटा वाटल्यास पुढच्या वर्षी द्या, अजितदादा विमान दुर्घटना प्रकरणात महाराष्ट्रातील जनतेला शंका असणारे कटाचे मुख्य सूत्रधार सुमित कपूर, साहिल मदन, यश व त्यांचा वडील व्ही. के. सिंह कुठे आहेत तेही नंतर सांगा, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. विमान अपघातात कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने झाली? असे अनेक प्रश्न आमदार मिटकरी यांनी उपस्थित केले.
