Shinde Group offer to Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. त्यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठविण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता, त्यांचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. त्यावरून शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचे असल्यास त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा, असा खोचक सल्ला म्हस्के यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेची निवडणूक नेमकी कशी होते? त्यासाठी मतांचा कोटा नेमका कसा ठरतो? उद्धव ठाकरे पुन्हा आमदार कसे होणार, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर काय?

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा. ते मोठ्या मनाचे नेते असून फोन केल्यास तुमच्यामागे ठामपणे उभे राहतील. संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ आल्याचा टोलाही म्हस्के यांनी लगावला. तर, समन्वयाने मार्ग निघतात आणि एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे आहेत, असा सल्ला मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंना दिला. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटणार होते आणि त्याची शंका आल्यानेच त्यांनी आपला उमेदवार दिला नाही. जर ठाकरेंनी उमेदवार दिला असता, तर तो निवडून आला नसता, असा दावाही म्हस्के यांनी केला.

ठाकरे गटाचे म्हस्केंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा, असा सल्ला देणाऱ्या खासदार म्हस्के यांचा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेतला. नरेश म्हस्के तिकिटासाठी आधी कोणाकडे जात होते. त्यांना जिल्हाप्रमुख, नगरसेवक, महापौर कोणी केले? मुळात एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे फोन करू शकत होते. मात्र, त्यांनी फोन न करता, एका झटक्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विधान परिषदेवर जाण्यासाठी आता ते का फोन करतील? संख्याबळानुसार कोण सभागृहात जाईल, हे महाविकास आघाडीतील नेते ठरवतील. शेतकऱ्यांसह जनतेचे विविध प्रश्न असताना त्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी हे असे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून चर्चेत आणले जातात, असे प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिले.

आणखी वाचा : शिंदेंना फोन करण्याचा ठाकरेंना सल्ला; महायुतीतील आणखी एक मंत्री अडचणीत? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

विधान परिषदेची निवडणूक कशी होते?

विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया नाही. उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने या निवडणुकीत मतांचे गणित जुळवणे सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असते. समजा, महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे आणि विधानसभेतील २८८ आमदार मतदान करणार आहेत; तर एकूण आमदार २८८ भागीले १० अधिक १ असे केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो. त्यात येणाऱ्या उत्तराचा फक्त पूर्णांक भाग घेतला जातो, जो इथे २७ इतका आहे. विधान परिषदेत एका मताचे मूल्य हे १०० असते. याचाच अर्थ २७०० म्हणजेच एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान २७ पहिल्या पसंतीची मते आवश्यक असतात. या निवडणुकीत मतदाराला (आमदाराला) केवळ एका उमेदवाराला मत द्यायचे नसते, तर पसंतीक्रम (१, २, ३…) नोंदवायचा असतो. एखाद्या उमेदवाराला कोट्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अतिरिक्त मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे वर्ग केली जातात. जर पहिल्या फेरीत जागा भरल्या गेल्या नाहीत, तर ज्याला सर्वांत कमी मते आहेत त्याला बाद केले जाते आणि त्याची मते इतरांकडे हस्तांतरित होतात.

हेही वाचा : अविश्वास ठरावावर मॅच फिक्सिंग? लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवणे कठीण? चर्चेमागची कारणे काय?

ठाकरे गटाकडे नेमके किती संख्याबळ?

सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे विधानसभेत २० आमदारांचे संख्याबळ आहे. जर एका जागेसाठी २७ मतांची गरज असल्यास ठाकरे गटाला एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अतिरिक्त सात ते आठ मतांची जुळवाजुळव करावी लागेल. सध्या महाविकास आघाडीकडे एकूण ४६ आमदारांचे संख्याबळ असून, त्यांना माकप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून यायचे असल्यास आपल्या मित्रपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. यादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या २० आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्याकडील १० आमदार ठाकरे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर पुन्हा निवडून येतील, अशी अशा ठाकरे गटातील नेत्यांना आहे.