आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली… माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश करताच प्रहार जनशक्ती पक्षातील प्रभावशाली नेत्याने तीव्र संताप व्यक्त करीत बंडाचे संकेत दिले… माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या तब्बल १६ शाळांचा कारभार प्रशासकांनी ताब्यात घेतला… बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ लढत नको व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिका युवानेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली… मलाही शिंदे गटात प्रवेशाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट करीत आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना शुभेच्छा दिल्या. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंना धक्का देण्याची शिंदे गटाची तयारी?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे आपल्या सात नगरसेवकांसह लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या फुलंब्रीत ठाकरे गटाची सत्ता आली होती. मात्र, आता ठोंबरे यांनी आपल्या सात नगरसेवकांसह शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. विकासासाठी निधी मिळविण्यासाठी ठोंबरे यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. फुलंब्री तालुक्यातील प्रभावशाली नेते मानले जाणारे ठोंबरे यांनी जर धनुष्यबाण हाती घेतल्यास हा ठाकरे गटाला मोठा धक्का असेल. त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये लवकरच मोठं बंड?
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदे गटात प्रवेश करताच कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारीही मिळाली. मात्र, त्यांच्या या निर्णयावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधले यांनी तोफ डागली. ‘प्रहार’मध्ये करणारा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगणारा आहे. मात्र, बच्चू कडू यांनी एका आमदारकीसाठी आमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला बांधला आहे. पक्षासाठी राबणाऱ्या, अंगावर अनेक केसेस घेणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उध्वस्त करून तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि मिळालेली आमदारकी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशा त्यांनी कडू यांच्यावर टीकेची तोफ डागली. तुम्ही खुशाल एकनाथ शिंदे यांच्या पायाशी लोटांगण घाला, आम्ही लवकरच आमचा नवा मार्ग निवडू, असे संकेतही त्यांनी दिले. बोधले यांच्या या इशाऱ्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षात लवकरच मोठी फूट पडणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली.
माजी मंत्र्याच्या तब्बल १६ शाळांवर प्रशासक
नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला शिक्षण विभागाने मोठा धक्का दिला आहे. माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या या संस्थेच्या १६ शाळांचा कारभार अखेर प्रशासकांनी ताब्यात घेतला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने शाळांवर प्रशासक नियुक्त झाल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या घटनेला ‘शैक्षणिक भूकंप’ म्हणून संबोधले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या शाळांमधील कारभार शिक्षण विभागाच्या रडारवर होता. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या तपासणीत विविध त्रुटी आणि आर्थिक गैरव्यवहार आढळून आल्याचा ठपका शिक्षण विभागातर्फे ठेवण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी संस्थेच्या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली होती. त्याची दखल घेत शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संबंधित शाळांची स्वतंत्र सुनावणी घेतली आणि गेल्या मार्च महिन्यात संस्थेच्या एकूण २६ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे.
“बारामतीत पवार विरुद्ध पवार नकोच”
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ लढत नको व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार गटाचे युवानेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दोन लाख २४ हजार मतदान झाल्याचे सांगत त्यापैकी दोन लाख वीस हजार मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित दादांच्या विमान अपघातात संदर्भात आमचे म्हणणे एवढेच आहे की, सत्य समोर आले पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, जो विमान कंपनीचा अहवाल आला होता, त्यामध्ये आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या बाजूने तपास होत असला तरी यातून सत्य बाहेर आले पाहिजे, असे युगेंद्र यांनी म्हटले आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको असे माझे मत आहे. याआधी जय पवारदेखील हेच बोलले आहे. गुरुवारी सुप्रियाताईंचे वक्तव्य मी ऐकले. सुनेत्रा काकींची देखील अशी लढत न होण्याची इच्छा आहे. आम्ही कुटुंब म्हणून एक असले पाहिजे, यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे, असेही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
आमदार रवी राणा यांचा गौप्यस्फोट
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदे गटात प्रवेश करताच बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. यादरम्यान बच्चू कडू यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार रवी राणा यांनी त्यांना शुभेच्छा देताना एक गौप्यस्फोटही केला. काही दिवसांपूर्वी माझे शिवसेना नेते आशीष जयस्वाल, संजय राठोड यांच्यासोबत बोलणे झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मला सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेत आले पाहिजे. पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे. राजकारणात आहे तोपर्यंत फडणवीस यांच्यासोबत निष्ठेने राहील, असे राणा यांनी माध्यमांना सांगितले. मला काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनीच बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशाविषयी मला माहिती दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
