आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा संघर्ष टोकाला पोहोचला असून भाजपाच्या फोडाफोडीची भीतीने शिंदे गटाने आपले सदस्य अज्ञातस्थळी अज्ञातस्थळी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली… प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली… अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स आणि रेकॉडर जळाल्याची चर्चा रंगल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले… हैदराबाद गॅझेटची अधिसूचना काढूनही कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप होत नसेल तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध व्यक्त करताना ‘औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवू’ असा दावा भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ….

भाजपाच्या फोडाफोडीची शिंदे गटाला धास्ती?

सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा संघर्ष टोकाला पोहोचला असून भाजपाच्या फोडाफोडीची भीतीने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना अज्ञातस्थळी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरीही २७ जागा जिंकून भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २१ आणि शिवसेना शिंदे गटाने १५ जागा जिंकल्या. यादरम्यान भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिंदे गट व राष्ट्रवादीने तयारी केली. दुसरीकडे- काहीही झाले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचाच होणार असल्याचे वक्तव्य भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांच्या फोडाफोडी होऊ नये म्हणून शिंदे गट व राष्ट्रवादीने जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञातस्थळी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

तुकाराम मुंढे यांच्यावर बच्चू कडूंची नाराजी

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे रूजू झाल्यानंतर हे मंत्रालय वेगाने चालेल असे वाटले होते; पण ते त्यांच्याच तोऱ्यात आहेत, असे बच्चू कडू म्हणाले. शासकीय सेवेत अंपगांसाठी असलेल्या ४ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीची खातरजमा करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने राज्य शासनाच्या सर्व ४० विभागांना त्यांच्या अपंग कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. मात्र, केवळ दोनच विभागांनी माहिती सादर केली असून ३८ विभागांनी माहिती देण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन-तीन दिव्यांग त्यांचे प्रश्न घेऊन तुकाराम मुंढे यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी दिव्यांगानाच रजिस्ट्रेशन आहे का, तुम्हाला भांडण्याचा अधिकार आहे का, असे प्रश्न केल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

आणखी वाचा : भाजपाच्या बड्या नेत्यासह शेकडो समर्थकांनी सोडला पक्ष; कोण आहेत अरविंद खन्ना? त्यांनी राजीनामा का दिला?

विमान अपघातावर रोहित पवार यांचं मोठं विधान

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमानाला झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या अपघातावर शरद पवार यांच्या पक्षातील नेते सुरुवातीपासूनच शंका घेत आहे. यादरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्स आणि रेकॉडरचं अपघातानंतर विमानाला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावर काय राजकारण चालले आहे, हे आपल्याला बघावे लागेल. त्याच्या खोलामध्ये जावे लागेल. दरम्यान, उद्या अधिक खोलात जाऊन या घटनेवेळी काय घडले असावे, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत, असेही पवार म्हणाले.

मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा

हैदराबाद गॅझेटची अधिसूचना काढूनही कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप होत नसेल तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला, ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही कुणबी नोंदी का सापडत नाहीत? याचे उत्तर द्यावे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आहे. मात्र, सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते. गोरगरीबांचा अवमान सहन केला जाणार नाही, असेही जरांगे म्हणाले. अधिवेशनानंतर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय न झाल्यास आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल. त्याची सरकारला मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद? कोण आहेत? टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद कसा निर्माण झाला?

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवू : नवनीत राणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध व्यक्त करताना ‘औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवू’ असा दावा भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केला. काँग्रेस पक्षाचे टिपू सुलतानविषयी असलेले प्रेम आता उतू चालले आहे. कधी औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन काँग्रेस करते, तर कधी टिपू सुलतानची प्रतिमा लावणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम काँग्रेस पक्ष करतो. काँग्रेसची हीच विचारधारा आहे. गेल्या ६० वर्षांपासून ती काँग्रेसने जपली आहे; पण आता ती त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागली आहे, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर केली. लवकरच औरंगजेबाची कबर लवकरच महाराष्ट्रातून हटविली जाईल, त्या कामावर सुद्धा आम्ही लागलो आहोत. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत अमानूष पद्धतीने छळ करून मारले, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आपण काय सिद्ध करीत आहोत, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे, हे गेल्या ६० वर्षांचे काँग्रेसचे पाप आहे, अशी टीकाही राणा यांनी केली.