आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : भाजपाला धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाने काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेशी पडद्यामागून चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली… चंद्रपूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत ठाकरे गटाचे नगरसेवक प्रत्येकी एक कोटींना विकले गेल्याचा आरोप मनसेच्या नेत्याने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करतांना शिवसेनेची भूमिका ठरवणारा भाजपा कोण असा सवाल शिंदे गटाचे मंत्री मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेतून केला… अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली… गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपाला फटका देण्याची शिंदे गटाची तयारी?
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्यात जोरदार चुरस रंगली आहे. यादरम्यान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाने काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेशी पडद्यामागून चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक १९ जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ शिंदे गटाने १५ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सहा व ठाकरे गटाला सात जागा मिळाल्या असून काँग्रेसला केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्तास्थापनेसाठी २८ जागांचा आकडा गाठणे गरजेचे असल्याने शिंदे गटाने काँग्रेससह ठाकरे गटाशी बोलणी सुरू केल्याचे समजते आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा?
चंद्रपूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसला अवघ्या एका मताने सत्तेपासून दूर राहावे लागल्याने त्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. यादरम्यान महापौर व उपमहापौर निवडणुकीत ठाकरे गटाचे नगरसेवक प्रत्येकी एक कोटींना विकले गेल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी १ कोटी रुपये घेतले, असा आरोप ज्यांनी केला ते भाजपासोबत पैसे मोजायला बसले होते का? त्यांचे २० टक्के कमिशन होते का? असे राऊत म्हणाले. त्यावर चंद्रपूरचे डील होणार हे संजय राऊतांना माहिती होते. त्यात काही सरप्राइज नाही. आता फक्त ते जे बोलले ते उलट घडत आहे. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असे आहे, असे उत्तर देशपांडे यांनी दिले. दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये रंगलेल्या या शीतयुद्धावरून ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा पडला आहे का, असा प्रश्न काहीजण विचारत आहेत.
मंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपावर संताप
जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करतांना शिवसेनेची भूमिका ठरवणारा भाजपा कोण असा संतप्त सवाल शिंदे गटाचे मंत्री मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेतून केला. महापालिका निवडणुकीवेळी भाजपाने सोयीस्कर भूमिका घेतली होती, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. जिल्हा परिषदेची निवडणुकीनंतर सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यावरून पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज आहे, तर भाजपला १३ जागांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता स्थापन होईल असे सांगत असताना शिवसेना शिंदे पक्ष आमच्यासोबत सत्तेत सहभागी असेल असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांनी महापालिका निवडणुकीवेळी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रारंभी आठ जागा देण्याची तयारी दर्शवली. यानंतर दोन जागा देऊ केल्या आणि अखेरच्या क्षणी क्षमस्व म्हणून चर्चा थांबवली. तरीही शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचे सात सदस्य तर पंचायत समितीत १९ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करतांना शिवसेनेची भूमिका ठरवणारा भाजपा कोण? असा प्रश्न उपस्थित केला.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयात भ्रष्टाचाराची एक खळबळजनक घटना घडली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला मंत्रालयातच लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री झिरवाळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दुसरीकडे- याप्रकरणात माझा कोणताही संबंध आढळल्यास तात्काळ राजीनामा देईन, अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणात काय सत्य समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात राहुल गांधी आणखीनच आक्रमक; खासदारकी रद्द करण्याबाबत काय म्हणाले?
संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका
परभणी महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची निवड नुकतीच करण्यात आली, तर उपमहापौरपदी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड झाली. यादरम्यान मुस्लीम महापौर बसविल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. २०१९ ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला, असा खोचक घणाघात शिंदे यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. परभणीत भाजपाचे १२ नगरसेवक मुस्लीम आहेत. हे एकनाथ शिंदेंना माहीत आहे का? इतर ठिकाणीही असंख्य मुस्लीम नगरसेवक आहेत. या राज्यात मराठी भाषिक मुस्लीम आहेत. ते काही घुसखोर नाहीत. आमचे अनेक पदाधिकारी मुस्लीम असून ते वर्षानुवर्ष काम करत आहेत. ते मुस्लीम आहेत, म्हणून त्यांना पदापासून दूर ठेवणार का? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलवान परवडला, असे राऊत यांनी म्हटले आहे.

