अलिबाग- सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्यील ७० टक्के जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा सांगितला आहे. शिवसेना हाच क्रंमांक एकचा पक्ष असल्याचा दावा उदय सामंत यांनी शिवसेना पक्ष मेळाव्यात केला. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कुडाळ येथील पावशी शांतादुर्गा मंगल कार्यालयात शिवसेना शिवसेनेच्या (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी आणि फलोत्पादन भरत गोगावले, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, संजय आंग्रे, दत्ता सामंत, संजू परब, संजय पडते महिला आघाडी प्रमुख दीपलक्षमी पडते यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात शिंदे गटच एक नंबरवर असल्याचा सूर उमटला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद लक्षात घेता, आगामी निवडणुकांमध्ये महायुतीत ७० टक्क्यांहून अधिक जागांवर आपला दावा असल्याचे स्पष्ट केले. या जागा मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षात घेऊन जागा वाटपात मोठा वाटा शिवसेनेला मिळायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीनंतर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना सत्तर टक्के जागा मागणार असेल, तर आमचा पक्ष स्वबळावर निवडणूका लढण्यास तयार आहे, असे म्हणत भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात शिवसेना भाजपत सुप्त संघर्ष पहायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली, शिवसेनेनी त्यांचा पक्ष जरूर वाढवावा पण महायुती मधील कार्यकर्ते फोडू नयेत असा सल्ला दिला होता.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सरू आहे. त्यातुनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षात वर्चस्ववादाच्या सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपच्या नितेश राणे यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपवर दबाब टाकण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याचे सध्या पहायला मिळत आहे.
गोगावले यांच्या वक्तव्यावरून भाजपचा संताप…
शिवसेना मेळाव्यात बोलतांना नारायण राणे येवढ्या उंचीवर असेच पोहोचले नाहीत, त्यांनी केसेस घेतल्या, मारामारी केली, जेल मध्ये गेले, मर्डरही झाले असे विधान गोगावले यांनी केले. या विधानानंतर भाजपने संताप व्यक्त केला. गोगावले यांनी सात दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा तिरडी आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिला.