जयेश सामंत, लोकसत्ता
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात सत्ताबदल झाला आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेबाहेर असलेल्या भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आनंद काही काळ गगनात मावेनासा झाला. ठाणे जिल्ह्यातील भाजपला मात्र सत्ताबदलानंतर अवघ्या काही दिवसातच आपल्यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे याची जाणीव व्हायला लागली. मागील नऊ- दहा महिन्यात तर शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर सातत्याने खटके उडत असून राज्यातील मंत्री मंडळात सहभागी असलेले रविंद्र चव्हाण यांनाही याची झळ पोहचू लागल्याने आता आम्हाला वाली कोण असा सवाल जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी दबक्या सुरात करु लागले आहेत. डोंबिवलीत चव्हाण यांचे कट्टर समर्थक नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करायला हवी होती असे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. हा लोकप्रतिनिधी कोण या प्रश्नाचे उत्तर कांबळे यांनी जाहीरपणे दिले नसले तरी भाजप कार्यकर्त्याचा रोख मात्र मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसून आले.
आणखी वाचा-सुनील तटकरे नाराज का झाले?
चव्हाण-शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला ?
डोंबिवली पुर्व येथील भाजप मंडळ अध्यक्ष असलेले नंदू जोशी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याने संघ वर्तुळात नाराजीचा सुर व्यक्त होताना दिसत असला तरी भाजपमध्ये मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात जाहीरपणे संघर्षाची भाषा सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे खासदार शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बागडे यांची मानपाड्यात नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस
काही दिवसांपूर्वी ठाण्यात भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक व्हा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ठाण्यातील आनंदनगर भागातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांच्या दबावामुळे थेट ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या तक्रारी चव्हाण यांच्यापुढे मांडण्यात आल्या होत्या. यावर ‘तुम्ही रडत काय बसता, आक्रमक व्हा. अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्या’ अशास्वरुपाचे बोधामृत पाजून चव्हाण डोंबिवलीत परतले होते. नंदू जोशी यांच्यानिमीत्ताने चव्हाण यांना आम्ही काय सहन करतो आहोत याची जाणीव होईल, अशी प्रतिक्रिया ठाणे भाजपमधील एका मोठ्या नेत्याने लोकसत्ताला दिली.
आणखी वाचा- समाजाच्या पाठबळामुळेच पंकजा मुंडे यांच्या सततच्या इशाऱ्याकडे भाजपचे दुर्लक्ष
नंदू जोशी यांच्यावर कोणाच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाला हे सर्वाना ठावूक आहे. युतीधर्म पाळायचा म्हणून आम्ही नेहमीच शिवसेनेला साथ देत आलो. त्याची परतफेड म्हणून आम्हाला बदनाम करणे, खच्चीकरण करणे असे प्रकार होत असतील तर ते सहन करणार नाही. यावेळी लोकसभेसाठी आम्ही भाजप उमेदवारासाठीच काम करु. उड्या मारणाऱ्यांना त्यांची कुवत काय आहे हे दाखवून देऊ. –शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष भाजप, कल्याण<
“दोन सख्खे भाऊ छोट्या कुरबुऱ्या होतातच, पण वेळेला एकत्र येतात. मोर्चात सहभागी होण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करुन आम्हाला आदेश असते तर आम्ही गेलो असतो. कुरबुऱ्यांकडे कधी कानाडोळा करायचा असतो. फार गंभीर घ्यायचे नसते.” –राजेश कदम, उपजिल्हाप्रमख, शिवसेना.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shindesena bjp conflict in thane district has reached an extreme print politics news mrj