दिगंबर शिंदे
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णा डांगे यांनी शिराळ्यात जाउन पुढचे आमदार सम्राट महाडिक असतील अशी घोषणा केली. तत्पुर्वी त्यांनी कोल्हापूरमध्ये व्यासपीठावर जाउन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी हितगुज केले होते. आमदार पाटील यांचे समर्थक असताना उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी केलेल्या कानगोष्टीकडे एकवेळ डोळेझाक झाली असली तरी शिराळ्यात जाउन तेथे आमदार पाटील यांचे पारंपारिक विरोधक असलेल्या महाडिक गटाला प्रोत्साहन देणारे वक्तव्य चर्चेचा विषय न बनले असते तरच नवल. कारण या ठिकाणी सध्या असलेले आमदार मानसिंगराव नाईक हे आमदार पाटील यांचे समर्थक असून त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे की, सूचक इशारा आणि तोही खुद्द आमदार पाटील यांच्याकडून हे येणारा काळच सांगणार आहे.
शिराळ्यातील राजकारण दोन नाईक आणि देशमुख या गटातच आतापर्यंत चालत आले. स्व. शिवाजीराव देशमुख यांनी या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत राज्य पातळीवर अगदी गृहमंत्री पदापासून विधानपरिषदेच्या सभापती पदापर्यंत पदे भुषवली.त्यांचा गट काँग्रेसमध्ये होता. मात्र, या गटाला शह देत शिवाजीराव नाईक यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व तयार केले. आजही या तालुक्यात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. मात्र, देशमुख गटाचे नेतृत्व करणारे सत्यजित देशमुख हे सध्या भाजपमध्ये असून त्यांच्यावर पक्षाने हातकणंगले लोकसभा प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपची लोकसभेची उमेदवारी जरी आजच्या घडीला अनिश्चित नसली तरी पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी या मतदार संघात सुरू केली आहे. देशमुख घराणे गेल्या तीन दशकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने या गटाची आजही ताकद आहे. मात्र, या मतदार संघामध्ये देशमुख गट ज्या बाजूला होईल त्यांच्या गटाला विधानसभेचे प्रतिनिधीत्व मिळते हा आजवरचा इतिहास आहे.
आणखी वाचा-कोणता झेंडा घेऊ हाती?
गतवेळच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. शिवाजीराव नाईक विरूध्द मानसिंगराव नाईक यांच्या लढतीत महाडिक गटाने अपक्ष मैदानात उतरून 50 हजार मतदान घेतले होते. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. मात्र यावेळी त्यांच्यासोबत देशमुख गट आहे. भाजपकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करण्याचा अलिखित करार दोन्ही गटात झाला असून त्याच दिशेने महाडिक आणि देशमुख कार्यरत आहेत. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून मोर्चेबांधणीची जबाबदारी महाडिकांवर सोपवली आहे. बदलत्या काळात चिखलीचे नाईक घराणे एकत्र आले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तरी हा गट आणि आमदार गट एका व्यासपीठावर असून नाईक घराण्यात बेरजेचे राजकारण घडवून आणण्यात जयंत पाटील यांचा मोलाचा हात आहे. तसेच शिराळा मतदार संघात असलेल्या वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये आमदार पाटील यांचा प्रभाव असल्याने या भागातील मतदारच गुलाल कोणाचा हे निश्चित करतात. मात्र, अलिकडच्या काळात पेठनाययावरील महाडिकांची मोर्चेबांधणी सुरू असल्याने बदलती गणिते अनिश्चितता वाढवणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
आणखी वाचा-मोहिते-पाटलांचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न
इस्लामपूरच्या राजकारणात आमदार पाटील यांना डांगे यांची सोबत महत्वाची वाटते. या बदल्यात डांगे यांचे पुत्र चिमण डांगे यांना नगराध्यक्ष पदही राष्ट्रवादीच्या ताकदीवर दिले. डांगे यांनीही आपली संघ निष्ठा खुंटीला टांगून राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आपली जागा निश्चित केली. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पेठ नाययावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागतासाठी न जाता कोल्हापूर का गाठले हाही चिंतनाचा विषय आहे. ही बाब केवळ औपचारिकता होती असा खुलासा डांगे यांनी केला असला तरी हा खुलासा राष्ट्रवादीच्या म्हणजचे आमदार पाटील यांच्या समर्थकांच्या पचनी पडतो की नाही तोवर शिराळ्यात जाउन पुढचे आमदार महाडिकच असतील असे वक्तव्य अजाणतेपणे केले होते असे म्हणणे भाबडेपणाचेच ठरेल. आमदार पाटील यांनी नाईकांच्या हाती जिल्हा बँकेची सूत्रे दिली आहेत. आमदार नाईक यांचीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक असल्याचेही बोलले जात असले तरी त्यांनी याचा इन्कार करून आमदार पाटील यांच्यासोबतच म्हणजेच शरद पवार गटात राहण्याचे जाहीर केले आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय संभ्रमावस्थेत आमच्या विना तुमचे राजकीय भवितव्य अडचणीत येउ शकते असा सूचक इशारा अण्णा डांगे यांच्या वक्तव्यामागे लपलेला नाही ना?