पुणे : पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील भोसरी या दोन मतदार संघांचा समावेश असलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघ हा शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्यानिमित्ताने चर्चेत आला आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, या निवडणुकीमुळे शिरुर विधानसभा मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे काही नेते हे एकत्र आल्याने शिरुरमध्ये नवीन राजकीय समीकरणे जुळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी (पाच जुलै) मतदान होऊन निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र, मतदार यादीतील त्रुटी आणि ग्रामपंचायत सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या बाजार समितीची निवडणूक सुमारे नऊ वर्षांनी घेण्यात येणार होती. मात्र, शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींपैकी ७६ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. त्यामुळे सुमारे ७७९ ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. केवळ २०६ मतदारांची नावे मतदार यादीत होती. याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तोपर्यंत निवडणुकीच्या काळात शिरुरमध्ये नवीन राजकीय समीकरणे जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार अशोक पवार आणि भाजपचे दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यात सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये लढत झाली. त्यामुळे ही दोन कुटुंबे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समजली जातात. मात्र, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे जुळली. या निवडणुकीत महायुतीने शेतकरी विकास पॅनल तयार केला. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे एकत्र आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आले. भाजपमधील अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली.

पवार-पाचर्णे यांच्यात हातमिळवणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात असलेले माजी आमदार अशोक पवार आणि भाजपचे दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे यांनी हातमिळवणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दामू घोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना संधी न मिळाल्याने ते माजी आमदार अशोक पवार यांच्याबरोबर गेले आहेत. त्याचबरोबर भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे आदी नेते एकत्र आल्याने नवीन राजकीय समीकरणे जुळून आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरुरमधील आतापर्यंतच्या लढती

शिरुर विधानसभा मतदार संघामध्ये भाजप आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रतिस्पर्धी पक्ष राहिले आहेत. ‘राष्ट्रवादी’ने या मतदार संघाची १९९९ मध्ये पहिली निवडणूक लढविली. ‘राष्ट्रवादी’ने माजी आमदार पोपटराव गावडे यांना उमेदवारी दिली. भाजपने जयश्री पालांडे यांना उभे केले. त्यामध्ये गावडे हे विजयी झाले. २००४ मध्ये भाजपचे बाबुराव पाचर्णे यांनी गावडे यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीत भाजपने पाचर्णे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार हे निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिल्याने पाचर्णे हे अशोक पवार यांना पराभूत करून विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत अशोक पवार यांनी पाचर्णे यांचा पराभव केला. दरम्यान पाचर्णे यांचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने अशोक पवार यांनी निवडणूक लढविली. त्यामध्ये कटके हे विजयी झाले.