पुणे : शिरुर नगरपरिषदेत सर्वाधिक जागा मिळवूनही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. ही सल सतत मनात असलेल्या भाजपची खेळी अखेर यशस्वी झाली आहे. दोन्ही ‘राष्ट्रवादीं’नी फारकत घेतल्याने महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे मित्र पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे भाजपचा आता सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या. मात्र, शिरुर नगरपरिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्या. त्यामुळे भाजपची संधी गेली. या नगरपरिषदेत २४ जागांपैकी भाजप ११ जागांवर विजयी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला पाच जागा मिळाल्या. एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला साथ दिली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने सत्तेचे वाटप करताना नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना देण्यात आले. उपनगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मितेश प्रदीप गादिया यांना मिळाले. मात्र, भाजपने राजकीय डावपेच करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी हातमिळवणी केली. गादिया यांना पदावरून दूर करण्यासाठी मांडण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. ठरावाच्या बाजूने २० मते पडल्याने नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून दूर केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपची दोन्ही ‘राष्ट्रवादी’त वाद घडवून आणण्याची खेळी यशस्वी झाली आहे.
दोन्ही ‘राष्ट्रवादी’तील मैत्रीत दुरावा
शिरुरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र लढल्या. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार अशोक पवार हे एकत्र आले. शिरुरमध्ये माजी आमदार अशोक पवार आणि दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यात सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये लढत झाली. त्यामुळे ही दोन कुटुंबे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समजली जातात. मात्र, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे जुळली होती. आता नगरपरिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी मैत्रीचा हात पुढे केला. त्यामुळे भाजपचा आता सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजी-माजी आमदारांतील वर्चस्व कारणीभूत?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार माऊली कटके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यातील राजकीय वर्चस्व हे दोन्ही ‘राष्ट्रवादी’तील फुटीला कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या निवडणुकीत कटके यांनी पवार यांचा पराभव केला. त्यानंतर हा संघर्ष वाढत गेला आहे.
नगराध्यक्ष पद कोणाला?
नगरपरिषदेत भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हे पद सोडणार की स्वत:कडेच ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
