‘शिवसेनेचे ठाणे ‘ ठाकरे की शिंदे गटाबरोबर ? | Shiv Sena bastion Thane is now with whom Uddhav Thackeray or Eknath Shinde | Loksatta

‘शिवसेनेचे ठाणे ‘ ठाकरे की शिंदे गटाबरोबर ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाकडून आपली ताकद दाखविण्यासाठी विविध प्रकारे शक्तिप्रदर्शन केले जात आहे. हे चित्र दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी पहाट आणि आता दिघे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून दिसून आले.

Thane, Shiv Sena, bastion, Uddhav Thackeray, Eknath Shinde
‘शिवसेनेचे ठाणे ‘ ठाकरे की शिंदे गटाबरोबर ? ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

नीलेश पानमंद

ठाणे : शिवसेनेतील बंडाळी आणि राज्यातील सत्ताबदलाचे केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाकडून आपली ताकद दाखविण्यासाठी विविध प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची चढाओढ सुरू आहे. या दोन्ही गटाचा वाद इतक्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून त्यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंग घडल्याने ठाणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात शिवसेना दुभंगलेली असल्याचे चित्र आहे. सध्याचे चित्र पाहता आगामी पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटातील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी घराघरात शिवसेना पोहचविण्याचे काम केले. त्यामुळेच ‘आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा…शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशा घोषणा जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून दिल्या जातात. ठाणे जिल्ह्यातूनच शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली आणि तीही जिल्ह्याचे केंद्र असलेल्या ठाणे महापालिकेतच. त्यानंतर जिल्ह्यातील इतर पालिकांमध्ये शिवसेनेला सत्ता मिळविण्यात यश आले. ही सत्ता कायम ठेवण्यात आनंद दिघे यांनी महत्वाची भूमिका बजावली. आनंद दिघे यांचे २१ वर्षांपुर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविली. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सहा महिन्यांपुर्वी नवे सरकार स्थापन केले. या बंडाळीनंतर ठाणे जिल्ह्यातून त्यांना मोठे समर्थन मिळाले. खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र ठाकरे यांची साथ दिली.

हेही वाचा… प्रकाश आंबेडकर यांचा ‘नवीन घरोबा’ कितपत यशस्वी होणार ?

हेही वाचा… श्रीकांत शिंदेंच्या खासदारकीवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी फक्त…!”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाकडून आपली ताकद दाखविण्यासाठी विविध प्रकारे शक्तिप्रदर्शन केले जात आहे. हे चित्र दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी पहाट आणि आता दिघे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून दिसून आले. आनंद दिघे यांचे आम्हीच शिष्य असल्याचे दाखविण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटात अनेकांना पक्ष प्रवेश देऊन पदांचे वाटप करण्याची स्पर्धा रंगली आहे. ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघातील त्यांचे कट्टर विरोधक असलेले संजय घाडीगांवकर यांना पक्षात घेऊन उपजिल्हाप्रमुख पद दिले. किसननगर भागात घाडीगांवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खासदार विचारे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात वाद होऊन हाणामारीचा प्रसंग घडला. कधी काळी एकत्र असणाऱ्या या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी देऊन गुन्हे दाखल केले. यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्याच पक्षाचे दोन गट आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र आहे. त्यांच्यात निर्माण झालेल्या वितुष्टामुळे ठाणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात शिवसेना दुभंगलेली असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 15:26 IST
Next Story
Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी