दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील माने घराण्यात सध्या आठव्यांदा खासदारकी आलेली आहे. शिवसेनेकडून विजय मिळवल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार माने हे आता ढाल तलवार या नव्या चिन्हाशी जोडले गेले आहेत. यापूर्वीही त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांनीही २६ वर्षांपूर्वी पहिली निवडणूक याच चिन्हावर लढवली होती. त्यामुळे शिवसेना, ढाल तलवार व माने घराणे यांच्या नात्यांची नाळ पुन्हा एकदा जोडली गेली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : विश्लेषण : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

कोल्हापूर जिल्हा तसा काँग्रेस पक्षाच्या छायेतील भाग. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ. कोल्हापूर मतदारसंघातून उदयसिंहराव गायकवाड तर तत्कालीन इचलकरंजी मतदारसंघातून बाळासाहेब माने हे सलग पाच वेळा याच पक्षाकडून संसदेत पोहोचले.

हात ते ढाल तलवार

बाळासाहेब माने यांचे निधन झाल्यानंतर १९९६ साली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. आधी शरद पवार यांनी माने घराण्यात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाळासाहेब माने यांच्या स्नुषा श्रीमती निवेदिता माने यांनी निवडणुकीची तयारी केली. मात्र काँग्रेस अंतर्गत राजकारणात शरद पवार यांनी निकटचे संबंध असलेले माजी उद्योग , नगरविकास राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. निवेदिता माने यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ढाल तलवार हे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर कोणताही प्रमुख नेता सोबत नसतानाही त्यांनी साडेतीन लाखावर मते घेऊन त्यांनी प्रभाव दाखवून दिला. या निवडणुकीत १२ हजाराचे मताधिक्य मिळवून कल्लाप्पाण्णा आवाडे पहिल्यांदा संसदेत पोचले.

हेही वाचा : शिरूर लोकसभा मतदार संघाच्या बैठकीला विद्यमान लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही?

नाते शिवसेनेशी

दुसऱ्या निवडणुकीवेळी निवेदिता माने यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. याही निवडणुकीत आवाडे यांची सरशी झाली. तर तिसऱ्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. आवाडे काँग्रेसमध्येच राहून निवडणूक रिंगणात उतरले. माने यांचा हातावर घड्याळ बांधण्याचा निर्णय योग्य ठरला. त्यांनी या निवडणुकीत आवाडे यांच्यावर मात केली. त्या दोनदा राष्ट्रवादी कडून निवडून आल्या. तथापि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची संसदेत जाण्याची हॅट्रिक रोखली. गेल्यावेळी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी नवख्या धैर्यशील माने यांच्या हाती धनुष्यबाण सोपवले. त्यांनी लाखभर मतांच्या फरकाने शेट्टी यांना पराभूत केले.

हेही वाचा : अमरावती ‘पदवीधर’च्या आखाड्यात भाजप व काँग्रेसमध्ये सामना?

पुन्हा ढाल तलवार

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तेचे चित्र पालटले. धैर्यशील माने यांनी शिंदे यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांची शिवसेना असे पक्षाचे नाव मिळालेल्या शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाले असल्याने धैर्यशील माने हे पुन्हा याच चिन्हाशी जोडले गेले आहेत.

हेही वाचा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून रायगडमध्ये राजकारण तापले

यशदायी ढाल तलवार

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत निवेदिता माने पराभूत झाल्या तरी शहर विकास आघाडी व तिचे ढाल तलवार हे चिन्ह पुढे यशस्वी ठरले. या चिन्हावर शहर विकास आघाडीने इचलकरंजी नगरपालिकेत सत्ता मिळवली. या आघाडीत कॉंग्रेसचा माने – कुंभार गट, भाजप, शिवसेना,माकप, स्थानिक गट यांचाही समावेश होता तर विरोधात कॉंग्रेसचा आवाडे गट होता. ‘बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, माने गट यांची ताकद वाढली असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ढाल तलवार चिन्हावर पुन्हा विजयी होऊ ,’ असा विश्वास धैर्यशील माने यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांनी धनुष्यबाण हे शस्त्र चिन्ह म्हणून निवडले होते तर आता आमच्या गटाला छत्रपती शिवाजी महाराज, मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे ढाल तलवार हे शस्त्राचेच चिन्ह मिळाले आहे. या आधारे इचलकरंजी महापालिका, अन्य नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथेही माने समर्थक ढाल तलवार चिन्हावर विजयश्री खेचून आणतील, असेही त्यांनी नमूद केले. या निमित्ताने शिवसेना, ढाल तलवार, माने घराणे यांच्या नात्यांचा पट पुन्हा एकदा जोडला गेला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena dhal talwar and mp dhairyshil mane family cm eknath shinde kolhapur print politics news tmb 01
First published on: 13-10-2022 at 14:14 IST