पुणे : शिवसेना (शिंदे) पक्षाने पुण्यातील कार्यकारिणी स्थगित केल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून सर्वच पदाधिकारी ‘प्रभारी’ आहेत. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कामकाजाकडे पाठ फिरविल्याने पक्षाचा ‘आव्वाज’ क्षीण झाला आहे. पक्षाच्या या स्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंंभीर दखल घेत नेत्यांना पुण्याकडे लक्ष देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे नेत्यांकडून झाडाझडती घेण्यात येत असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाला अपयश आल्याने दोन्ही शहरांतील कार्यकारिणी एप्रिल महिन्यात स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता हे पदाधिकारी ‘प्रभारी’ आहेत. पुण्यात या पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये सहाजण निवडून आले. पक्षावर ही नामुष्की ओढविल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दोन्ही शहरांतील कार्यकारिणी स्थगित करण्यात आली. उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर गेल्या चार महिन्यांत पक्षाचे कामकाज थंडावले आहे. कोणीच पक्षाच्या कामासाठी वेळ देत नसल्याने पक्षाचा आवाज आणखी क्षीण झाला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नेत्यांच्या पुण्यात भेटी

कार्यकारिणी स्थगित करण्यात आल्यानंतर गेल्या चार महिन्यांत पक्षाचे काम थंडावल्याने पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्थितीची गंभीर दखल घेतली आहे. पुण्याकडे लक्ष देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पक्षांतर्गत गटबाजी थांबविण्याची सूचना त्यांनी केली. या बैठकीला माजी आमदार, महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर‚ शहर प्रमुख प्रमोद भानगिरे‚ युवा सेनेचे किरण साळी उपस्थित होते. या बैठकीनंतर विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनीही सोमवारी बैठक घेऊन पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

नवीन कार्यकारिणीचे सुतोवाच; पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

उद्योगमंत्री उदय सामंत आणि विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर या दोघांनीही आढावा बैठक घेतल्यानंतर नवीन कार्यकारिणीचे सुतोवाच केले आहेत. सध्याची कार्यकारिणी ही प्रभारी असून, अंतर्गत गटबाजी न थांबल्यास या महिन्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.

सचिन अहिर यांनीही आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अहिर यांनी पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्याचे स्पष्ट केेले आहे. युवा सेनेतील काही पदाधिकाऱ्यांना मुख्य संघटनेत संधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाची शिफारस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली आहे.  काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विशेष कायर्कारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचेही आश्वासन अहिर यांनी दिले आहे. आगामी काळात नवीन कार्यकारिणी येण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रामुख्याने जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.