शिवसेना ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते तथा माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांच्या सूनबाई गिरीजा यांनी कौटुंबिक छळाचे आरोप करत थेट पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर ठाणे शहरातील कापूरबावडी पोलिसांनी विनायक राऊत यांच्यासह सात जणांविरोधात एफआयआर दाखल केला. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी राऊत कुटुंबियांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली. या जामीन अर्जावर २३ जुलैला सुनावणी होणार असल्याचे सांगितले जाते. या तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी विनायक राऊत यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचे समोर आले. यादरम्यान गिरीजा यांनी केलेल्या सर्व आरोपांचे राऊत कुटुंबियांनी खंडन केले. आमच्यावरील आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे सांगत ते सिद्ध करून दाखवावे असे खुले आव्हानच त्यांनी दिले, त्याविषयी…
गिरीजा राऊत यांचे नेमके आरोप काय?
गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर काबूरबावडी पोलिसांनी राऊत कुटुंबातील सात जणांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यात कौटुंबिक हिंसाचार, नरबळी व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या पत्नी शामल राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह एकूण ७ जणांविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संतती प्राप्तीसाठी सासरकडील मंडळींनी एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून आपल्याला वारंवार गोमूत्र पिण्यास भाग पाडले. तसेच विविध अघोरी आणि जादूटोण्याच्या प्रथा करण्यास सक्ती केली, असा आरोप गिरीजा यांनी केला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, २०१६ मध्ये विवाह जुळविणाऱ्या संस्थेकडे गिरीजा यांनी नोंदणी केली होती. या नोंदणीनंतर तत्कालीन खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश यांच्यासोबत त्यांचा विवाह जुळला. डिसेंबर २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर मुंबईत बंगला असल्याची खोटी माहिती दिल्याचा दावा तक्रारीत केला. त्यानंतर पतीने गिरीजा यांच्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली. याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केला. तसेच, सिंधुदूर्ग येथील काजीबाबा आणि फिरोज बाबा या दोघांच्या मदतीने आपल्यावर जादूटोणा सारखे अघोरी कृत्य करण्यात आले.
राऊत कुटुंबियांनी फेटाळले आरोप
गिरीजा या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्गमधील फिरोज शेख नावाच्या एका भोंदूला अटक केली असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे- विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबाने अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर २३ जुलै २०२६ रोजी सुनावणी करणार असून, तोपर्यंत पोलीस त्यांची चौकशी करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण वैवाहिक वादातून निर्माण झालेले कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, त्यांची सून गिरिजा राऊत गेल्या तीन वर्षांपासून वेगळी राहत आहे. वैवाहिक वादानंतर तिने पोटगी म्हणून २.५ कोटी रुपये, तीन बीएचके प्लॅट आणि कार अशी मागणी केली होती. त्यास नकार दिल्याने आमच्या बदनामीसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर तिच्यावर अत्याचार झाले होते, तर तिने यापूर्वी तक्रार का केली नाही? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
विनायक राऊत यांनी काय सांगितले?
३१ डिसेंबर २०२३ रोजी गिरीजा हिचे ‘स्त्रीधन’ असलेल्या १० ते १३ बॅगा तिच्या माहेरी पोहोचवण्यात आल्या होत्या. प्रत्येक वेळी तिच्या आर्थिक मागण्या वाढत गेल्या. सुरुवातीला दोन कोटी, नंतर पाच कोटी आणि अखेरीस १२.५ कोटी रुपयांपर्यंत मागणी पोहोचली. या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठीच आमची बदनामी केली जात आहे. मला पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल, असा विश्वासही विनायक राऊत व्यक्त केला. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग नसल्याचे सांगत हा पूर्णपणे कौटुंबिक आणि वैयक्तिक वाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांनीही या प्रकरणाचा पारदर्शक आणि निष्पक्ष तपास केला जाईल, असे सांगितले आहे.
कोण आहेत विनायक राऊत?
विनायक राऊत हे ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी यापूर्वी लोकसभेत ठाकरे गटाच्या संसदीय पक्षनेतेपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. २०१४ ते २०२४ या कालावधीत राऊत सलग दोनदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी विनायक राऊत यांनी १९९९ ते २००४ या कालावधीत मुंबईतील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले. त्यानंतर २०१२ मध्ये एकसंध शिवसेनेने त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राऊत यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत नेते अशी विनायक राऊत यांची ओळख आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकसंध शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली. त्यावेळी ४० आमदारांसह काही खासदार शिंदे यांच्याबरोबर सूरतमार्गे गुवाहाटीला निघून गेले होते; पण विनायक राऊत ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले होते.
