महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाजपाला जिवंत केले, नाहीतर राज्यात त्यांचे अस्तित्वच राहिले नव्हते, असे विधान शिंदेसेनेच्या आमदाराने केले… मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा इशारा दिला… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना सडेतोड भूमिका मांडली… पहिली विकेट धर्मेंद्र प्रधान यांची गेली, आता दुसरी विकेट ज्ञानेश कुमार यांची जाणार, असा दावा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला… काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मनोज जरांगे यांचा शिंदेंना इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा लक्ष्य केले. मला एकटे पाडले जात असून माझ्या विरोधात षडयंत्र आहे. सध्या मी शांत असलो तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. माझ्यासहित माझ्या निकटवर्तीयांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच या सर्व प्रकरणाचे आपण धागेदोरे शोधत असल्याचे म्हणत जरांगे यांनी शिंदेंना इशारा दिला.माझ्या विरोधात बैठका घेणे हे उपमुख्यमंत्र्यांचे काम नाही. तुम्ही कितीही लोक अंगावर घातले तरी मी मागे हटणार नाही. पण आपण ज्यांना मित्र म्हणतो तो आपला शत्रू आहे हे जेव्हा समजते तेव्हा धक्का बसतो, असेही ते म्हणाले. तसेच कितीही लोक अंगावर घातले तरी मागे हटणार नाही. समाजाच्या डोळ्यात पाणी आल्यास मोठे आंदोलन होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. त्यांच्या या आरोपांची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
विलीनीकरणावर शरद पवारांची सडेतोड भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना सडेतोड भूमिका मांडली. कोणाला यायचे असेल तर त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही, असे म्हणत विलीनीकरणाची चर्चा करणाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच सुनावले. शरद पवार यांच्या पक्षाची मुंबईत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान बोलताना शरद पवार म्हणाले की, मघाशी बोलताना प्रदेशाध्यक्षांनी एक वाक्य वापरले, ते बोलता बोलता असे बोलले की, आमच्यामध्ये विलीकरणाच्या काही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्पष्ट सांगतो की, सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या म्हणजे फक्त पक्ष शक्तिशाली करण्याच्या आहेत. त्यामुळे ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही आणि आमचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष म्हणूनच लढणार आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
“भाजपाला एकनाथ शिंदेंनीच जिवंत केले”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाजपाला जिवंत केले, अन्यथा राज्यात त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिला असता, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे प्रभावशाली नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. महायुती सरकार हे तीन पक्षांचे सरकार असून त्यात सगळ्यांची सारखीच दावेदारी आहे. भाजपाला एकनाथ शिंदे यांनीच संजीवनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात भाजपा कुठे सत्तेत होती? एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणूनच आज राज्यात भाजपा सत्तेत आहे, असे त्यांनी नंदुरबार येथील पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी भाजपाचे विजयकुमार गावित यांच्यावरही रघुवंशी यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. गावित यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्या मुळेच त्यांना अडीच वर्षे मंत्रिपद भोगता आले आहे, असेही ते म्हणाले. यादरम्यान भाजपाच्या सत्तेपासून ते गावितांच्या मंत्रिपदापर्यंत चंद्रकांत रघुवंशींच्या या वक्तव्याने नंदुरबारच्या राजकारणात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपा काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांचे सूचक विधान
पहिली विकेट धर्मेंद्र प्रधान यांची गेली, आता दुसरी विकेट ज्ञानेश कुमार यांची जाणार, असा दावा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीतील कथित फेरफाराच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. पहिली विकेट धर्मेंद्र प्रधान यांची गेली आहे, आता दुसरी विकेट ज्ञानेश कुमार यांची जाणार आहे आणि तिसरी विकेट कोणाची जाणार हे तुम्हाला सांगायची गरज नाही. सध्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त असून सरकारने काढलेला जीआर बोगस आहे. त्याचे आम्ही दहन करतोय, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या टीकेला आता भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ‘त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. मेंदू कोणाचा चोरीला गेला आहे? या लोकांनी थेट लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी चोरला… कुठली विचारसरणी… मुद्द्याचे बोला ना? मुद्द्यावर बोला की तुमचा मुख्य निवडणूक आयुक्त हा अमित शहा यांचा एजंट आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या केली. तुम्ही त्यांची बाजू का घेत आहात… तुम्ही कोण? तुम्ही त्यांचे वकील आहात का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने तुम्हाला वकील म्हणून नेमले आहे का? निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि घटनात्मक संस्था असताना मुख्यमंत्री तिची वकिली करत आहेत, याचा अर्थ ते काहीतरी लपवत आहेत. सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीनेच विविध घोटाळे केले आहेत, म्हणूनच ते आयोगाच्या बचावासाठी पुढे येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या टीकेला आता भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
