आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : भाजपावाले जसे आमची लोकं फोडतात, तसे तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा, असा अजब सल्ला शिंदेसेनेच्या मंत्र्याने शिक्षकांना दिला… मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यामध्ये केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली… पुण्यातील हिंजवडी परिसरात आयटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चावरून आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला तीव्र इशारा दिला… हिंदू सणांमधील डीजे बंद करण्यापूर्वी मशिदींवर पाचवेळा वाजणारे लाऊडस्पीकर बंद केले पाहिजेत, अशी भूमिका नवनीत राणा यांनी मांडली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेसेनेच्या मंत्र्याचा शिक्षकांना अजब सल्ला
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. जळगावमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यादरम्यान मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याबाबत भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना अजब सल्ला दिला. भाजपावाले जसे आमची लोकं फोडतात, तसे तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच, सध्या सर्व पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे. प्रत्येक पालकाला वाटते की आपला मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे. मुलाला शिकवण्यासाठी तर आजच्या काळातला बाप काहीही करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळा जोरदार चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका
मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “तुमच्या मंत्र्यांना आवरा,” असा टोला लगावताना सुळे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रविवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांकडे लक्ष वेधत सुळे यांनी सरकारला काही महत्वाचे प्रश्नही विचारले. राज्यात किती आंदोलने सुरू आहेत. मराठा, ओबीसी, आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. २०० आमदारांचे सरकार असूनही रोज आंदोलन कमी होत नाही. याचे आत्मचिंतन सरकारने केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचेच सरकार आहे. समाजात तेढ निर्माण होत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
राज ठाकरे यांचे खळबळजनक वक्तव्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यामध्ये एक खळबळजनक दावा केला. देशातील प्रश्नांना बगल देण्यासाठी गणेशोत्सवात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जात असून भाजपामधील लोक त्याबाबत बोलू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. उपस्थितांना संबोधित करताना राज म्हणाले १४ तारखेला गणपती येतील. मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचे इतर गोष्टीकडे दुर्लक्ष झाले पाहिजे. आताच मुंबईत त्याची झलक तुम्ही पाहिली असे. एक दोन घटना घडल्या, ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू आहे. जो सुजाण मुस्लीम आहे. दोघांनाही सांगायचंय की सतर्क राहा, असे आवाहनही राज यांनी केले. त्यांच्या या विधानाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
रोहित पवार यांचा महायुतीला इशारा
पुण्यातील हिंजवडी परिसरात आज शेकडो आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा, कचरा व्यवस्थापन, वीज, असे अनेक प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले होते. या मोर्चावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला. राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांच्या संतापाचं रूपांतर भविष्यात आणखी उग्र होईल आणि याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे रोहित यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पायाभूत सुविधांसाठी आयटी (IT) कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी काढलेल्या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
नवनीत राणा यांची आक्रमक भूमिका
हिंदू सणांमधील डीजे बंद करण्यापूर्वी मशिदींवर पाचवेळा वाजणारे लाऊडस्पीकर बंद केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका भाजपाच्या नेत्या नवनीत राणा एका वृत्तवाहिशी संवाद साधताना मांडली. गणेशोत्सवातील लाऊडस्पीकरच्या वेळेच्या मर्यादेवर एमआयएमचे वारिस पठाण यांनी घेतलेल्या आक्षेपाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. डीजे बंदीबाबत बोलताना नवनीत राणा यांनी राज्य सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाजवण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी कोणालाही १४ दिवस तुरुंगात जावे लागणार नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला. तसेच हिंदुस्थानात देशाची संस्कृती, सण आणि नियमांनुसारच गोष्टी चालतील. ज्यांना हिंदू सणांचा त्रास होतो, त्यांनी पाकिस्तानला चालते व्हावे, असा तीव्र संतापही राणा यांनी वारिस पठाण यांच्या आक्षेपावर व्यक्त केला.
