scorecardresearch

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख वादातून कायम चर्चेत

मालमत्ता प्रकरणातील चौकशीमुळे अडचणी वाढण्याची चिन्हे..

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख वादातून कायम चर्चेत
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख

प्रबोध देशपांडे

अकोला : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख विविध वादांमुळे कायम चर्चेत असतात. मालमत्ता प्रकरणात चौकशीसाठी आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आपण एकनिष्ठ राहिल्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आ.नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर केला आहे.

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यामध्ये शिवसेना फुटीच्या पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी सुरत गाठले होते. यावेळी प्रकृतीच्या कारणावरून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी सर्वप्रथम आ.नितीन देशमुख यांचे नाव राज्यात चर्चिले गेले. आ.देशमुख शिंदे गटासोबत सूरत येथे असतांना त्यांच्या पत्नीने अकोल्यात आमदार पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. शिंदे गटासोबत आ.देशमुख गुवाहटी येथे देखील गेले होते.

हेही वाचा >>> शिवसेना पक्षप्रमुखपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरु

गुवाहटीवरून ते नागपूरमार्गे अकोल्यात परतले. गनिमी काव्याने शिंदेंच्या तावडीतून आपण सुटका करून घेतल्याचे आ. देशमुख यांनी म्हणाले होते. वास्तविक त्यांनी गुवाहाटीवरून नागपूर खासगी विमानाने गाठले होते. त्या विमानाची व्यवस्था आपणच करून दिली होती, असा दावा नंतर एकनाथ शिंदे यांनी केला. या प्रकरणावरील पडदा उघडलेलाच नाही. उद्धव ठाकरेंविषयी एवढे एकनिष्ठ असतांना आ. नितीन देशमुख यांनी शिंदे गटासोबत सूरत व गुवाहाटी गाठलेच कसे? एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर पुन्हा ठाकरे गटात परतण्याची कारणे काय? आदींसह अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटात परतल्यामुळे नितीन देशमुख यांचे पक्षात महत्त्व वाढले.

हेही वाचा >>> राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई?

आ. नितीन देशमुख हे शिवसेना नेते खा. अरविंद सावंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. खा. सावंत यांच्यामुळेच आ. देशमुख शिंदे गटातून उद्धव ठाकरे गटात परतल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जाते. आ. नितीन देशमुख वादामुळे चर्चेत राहण्याचे सत्र काही संपले नाही. अकोला रेल्वेस्थानकावर शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी सुद्धा आ. नितीन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आ.नितीन देशमुख व त्यांच्या समर्थकांचा पोलिसांशी वाद झाला. यावेळी बाचाबाची व धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेले. त्यामुळे आ.देशमुखांसह त्यांच्या समर्थकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा >>> भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

आपल्यावर गुन्हे दाखल होतील याची अपेक्षा होतीच, अशी प्रतिक्रिया आ. देशमुख यांनी दिली. त्यानंतर आता ‘एसीबी’ने दिलेल्या नोटीसमुळे आ. देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले. यापूर्वीच आ. देशमुख यांनी एका सभेमध्ये आपल्याला एसीबीच्या चौकशीत अडकवण्याचा प्रयत्न करतील, असे म्हणाले होते. त्यामुळे मालमत्तेच्या एसीबी प्रकरणाचा त्यांचा अंदाज होताच, हे स्पष्ट होते. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला वरिष्ठांशी भेटा असे सूचवले. वरिष्ठ म्हणजे नेमके कोण? असा सवाल करीत आ. देशमुख यांनी आपण दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आ. रवि राणांवर टीका करतांना देखील त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. या ना त्या कारणावरून कायम चर्चेत राहण्याचा आ.देशमुख यांचा प्रयत्न असतो आणि सातत्याने होणाऱ्या वादामुळे ते साध्य देखील होत आहे.

युतीत विजय

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून नितीन देशमुख यांचा १८ हजारावर मतांनी विजय झाला. त्यांना विजयी करण्यात भाजपच्या गठ्ठा मतांचा देखील मोठा वाटा होता. यापूर्वी ते शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य होते. जनसुराज्य पक्षाकडून देखील त्यांनी विधानसभा निवडणूक लढली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 10:33 IST

संबंधित बातम्या