सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजापूर : मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्‍वास हीच आपली खरी संपत्ती आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. मुंबईतील बैठकांचे सत्र पूर्ण झाल्यानंतर आमदार साळवी यांचे मंगळवारी येथे आगमन झाले. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करताना कार्यकर्त्यांनी ‘शिवसेना झिंदाबाद’ , ‘राजन साळवी आगे बढो’ अशी जोरदार घोषणाबाजीही केली. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये झालेल्या सभेत साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख पांडुरंग उपळकर, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर इत्यादींसह माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी दिला आहे. त्यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याने अनेकांना मी त्यांच्यासोबत गुवाहाटीला जाईन, असा संशय होता. मात्र, आपण कधीच ‘नॉटरिचेबल’ नव्हतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक असून शिवसेना संघटनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम अन् विश्‍वासामुळे आपण शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला. कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील, असा विश्‍वास आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिला आहे, असेही साळवी यांनी या प्रसंगी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla rajan salvi said karyakarta is more important than power print politics news asj
First published on: 29-06-2022 at 11:48 IST