नवी दिल्ली : लोकसभाध्यक्षांकडे कॅव्हिएट दाखल करून तसेच, व्हीप जारी करून शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षातील फूट रोखण्याचा बुधवारी सकाळी जिवाच्या आकांताने प्रयत्न केला. पण, त्यांची सर्व धडपड व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून तसे पत्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिल्याचे समजते. बिर्लांनी या गटाला तत्वतः मान्यता दिल्याचे सांगितले जात असले तरी, सहाही खासदारांना प्रत्यक्षपणे बिर्लांची भेट घेऊन वेगळ्या गटाला अंतिम मान्यता घ्यावी लागेल. अजूनही हे बंडखोर खासदार बिर्लांना भेटले नसल्याने ‘ऑपरेशन टायगर’बाबतचा संभ्रम कायम आहे.

ठाकरे गटातील बंडखोर संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर व भाऊसाहेब वाकचौरे हे मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. धाराशीवचे खासदार आमराजे निंबाळकर यांना बुधवारी सकाळी दिल्लीत आणले गेले. त्यामुळे प्रश्न फक्त एका खासदाराचा म्हणजेच संजय दिना पाटील यांचाच होता. पाटील बुधवारी सकाळपर्यंत मुंबईमध्ये होते. दुपारपर्यंत ते दिल्लीत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याशी कोणाचाही थेट संपर्क होऊ शकलेला नाही. पाटील यांनी वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भातील पत्रावर स्वाक्षरी केली असेल व ते बिर्ला यांना प्रत्यक्ष भेटले तरच ठाकरेंच्या खासदारांचा वेगळ गट अधिकृतपणे स्थापन होईल. दुपारपर्यंत तरी बंडखोर ठाकरे खासदार वा शिंदे गटाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नव्हते.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी जयपूरमध्ये बिर्लांची भेट घेऊन ठाकरेंच्या खासदारांच्या वेगळ्या गटासंदर्भात औपचारिक बोलणे केल्याचे सांगितले जाते. बुधवारी सकाळपासून शिंदेंसह ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अज्ञातस्थळी शिंदेनी या खासदारांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी बंडखोरांकडून मंगळवारीच बिर्ला यांना पत्र देण्यात आल्याचीही चर्चा होत आहे.

बंडखोर खासदारांनी बिर्लांना पत्र दिल्याची कुणकुण लागल्यानेच ठाकरे गटाचे लोकसभेतील प्रतोद अनिल देसाई यांनी व्हीप जारी करून गुरुवारी सकाळी अकरा वाजता संसदेच्या पक्षकार्यालयात बोलावलेल्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश पक्षाच्या सर्व खासदारांना दिले. संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला राजाभाऊ वाजे उपस्थित राहिल्याने संजय दिना पाटील हेच बंडखोरी करू शकतील हेही स्पष्ट झाले. संजय दिना पाटील हे रविवारी मातोश्रीवर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित होते.

ठाकरे गटातील दुसरी बंडखोरी जवळपास निश्चित झाल्याने बुधवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे चौघेही भावूक झालेले दिसले. राऊत यांनी तर अत्यंत आक्रमक भाषेत बंडखोरांना लाखोली वाहिली. निष्ठावान खासदारांनी बिर्लांची भेट घेऊन वेगळ्या गटाला मान्यता न देण्याची विनंती केली आहे. हा वेगळा गट इतर कुठल्याही पक्षात समील होऊ शकत नाही.

लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार मूळ पक्ष अन्य पक्षात सामील व्हावा लागतो. तसे झालेले नाही. त्यामुळे कुठल्याही वेगळ्या गटाला मान्यता देण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे असे आम्ही बिर्लांना सांगितले आहे, असे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. केवळ दोन तृतियांश सदस्य जमले म्हणून कोणी इतर पक्षात विलीन होऊ शकत नाही, असाही दावा अनिल देसाईंनी केला.  बिर्लांच्या भेटीनंतर तीनही खासदार ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांना भेटायला गेल्याचे सांगण्यात आले.