ठाणे : भाजप आणि मनसे पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील ४५ उमेदवारांमध्ये ठाणे जिल्ह्यातही कोपरी- पाचपखाडी, ओवळा- माजीवडा वगळता एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील ऐरोली, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व आणि अंबरनाथ मतदार संघात शिंदेच्या सेनेचे उमेदवार अद्याप ठरत नसल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात आजवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा पराभव करत तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. यामुळे ठाणे जिल्हा शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. लोकसभेपाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. परंतु मित्र पक्ष असलेल्या भाजपने जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. तिथे शिंदेच्या सेनेतील इच्छुकांकडून बंडखोरी करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये ठाणे शहर, कल्याण पूर्व, मुरबाड या मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप इच्छुकांकडून शिंदेंच्या सेनेच्या वाटेला येणाऱ्या जागांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजप आणि शिंदेच्या सेनेपुढे असतानाच, शिंदेच्या सेनेचे उमेदवार अद्याप ठरत नसल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा… बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
हे ही वाचा… भाजप मलकापूरमध्ये भाकरी फिरवणार? तीन दशकांनंतर बंडाची चिन्हे
गेल्या निवडणूकीत महायुतीच्या जागा वाटपात कोपरी- पाचपखडी, ओवळा- माजीवडा, कळवा- मुंब्रा, ऐरोली, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व आणि अंबरनाथ या जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. त्यापैकी ऐरोली, कळवा-मुंब्रा, कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व, या जागांवर शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता. परंतु अडिच वर्षांपूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातील ओवळा- माजीवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची साथ दिली होती. या सर्वांना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. असे असतानाच शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील ४५ उमेदवारांमध्ये ठाणे जिल्ह्यातही कोपरी- पाचपखाडी, ओवळा- माजीवडा वगळता एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. कोपरी- पाचपखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर, ओवळा- माजीवडामधून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ऐरोली, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व आणि अंबरनाथ मतदार संघात शिंदेच्या सेनेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच महायुतीच्या जागा वाटपात कळवा मुंब्रा मतदार संघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला गेली असून त्यांनी नजीब मुल्ला यांची उमेदवारी जाहीर केली आहे.