राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ८ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (शिंदे) मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? विरोधकांनी कोणते आरोप केले? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’बद्दल काय सांगण्यात आले? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व संजय जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत का? ते सविस्तर जाणून घेऊयात.

“ऑपरेशन टायगरचा प्रत्यय एक महिन्यात येईल” – संजय शिरसाट

‘ऑपरेशन टायगर’चा प्रत्यय एक महिन्यात येईल, असा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार निवडणूक झाली तेव्हापासून आमच्या संपर्कात आहेत. परंतु, ‘ऑपरेशन टायगर’ केव्हा करायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. आम्ही उठाव केला होता तेच मूळ कारण आहे. उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, कोणाला बोलत नाहीत, कोणाची अडचण समजून घेत नाहीत. त्यामुळे आता त्या पक्षात राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार, आमदाराची नाही. त्यांना (उद्धव ठाकरेंच्या आमदार, खासदारांना) सगळ्यात जवळचे आणि आपलेसे वाटणारे फक्त एकनाथ शिंदे आहेत. ‘ऑपरेशन टायगर’चा प्रत्यय तुम्हाला एक महिन्यात येईल.” तर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी देखील ‘ऑपरेशन टायगर’बद्दल संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “ऑपरेशन टायगरबद्दल एकनाथ शिंदे यांनी अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. मी फक्त एवढंच सांगणार आहे, आगे आगे देखो होता है क्या…”

“कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींना वाऱ्यावर सोडले” – नरेश म्हस्के

“उबाठाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत उद्धव ठाकरे मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत”, असा दावा शिवसेनेचे (शिंदे) खासदार म्हस्के यांनी केला. “पक्षातील नाराजी असल्याने लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या उबाठाचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत”, असे खासदार म्हस्के म्हणाले. “खासदारांवर विश्वास नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम संजय राऊत करत आहेत”, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार संजय जाधव शिवसेनेच्या वाटेवर?

शिवसेनेचे नेते व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या राजकीय हालचालींबाबत बोलताना ‘आगे आगे देखो होता है क्या ’ असे हिंदीमध्ये म्हणत ‘ऑपरेशन टायगर’ च्या चर्चेस पुन्हा गती दिली. धाराशिव जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले , “शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचे ‘इनकमिंग’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसली तरी, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांपर्यंत अनेकांचा ओढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आहे.”

​खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, आबिटकर यांनी थेट नाव घेणे टाळले. मुख्यमंत्री शिंदेंच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक सोबतीला येत आहेत आणि ही प्रक्रिया अशीच सुरू राहील, असे म्हणत त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या पक्ष बदला विषयी संशय वाढवला. या अनुषंगाने निंबाळकर यांच्या समर्थकांनी हे दावे खोडून काढले आहेत. तर ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. “काळाचे भान ठेवून निर्णय घ्यावे लागतील”, असे परभणीचे खासदार जाधव एका मुस्लिम कार्यकर्त्याशी संवाद साधतानाची ध्वनीफित अलिकडेच समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. यामुळे संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

“फोटो प्रसिद्ध करा” – अरविंद सावंत

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत बातम्या पेरल्या जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “सध्या प्रत्येक खासदार ज्यांच्या-त्यांच्या कामात आहेत. मात्र, जर कोणी अशा बैठकीला गेलं असेल तर त्यांचे फोटो प्रसिद्ध करा. हे सर्व आता का सुरू आहे, याचं कारण आता २४ तारखेला आमच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. या माध्यमातून असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की, हे पाहा तिकडे काहीच शिल्लक नाही. सर्वकाही आम्हीच आहोत असं दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.”

एकनाथ शिंदेंनी कोणता खुलासा केला?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांची एकनाथ शिंदेंबरोबर बैठक झाल्याच्या चर्चांवर आता शिवसेना (शिंदे) पक्षाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खुलासा करण्यात आला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं सांगितलं आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, या केवळ अफवा आहेत. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.