मुख्यमंत्र्यांचे ‘खासदार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिष्मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ, निवडणूक आणि संघटन कौशल्याच्या जोरावर ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी विजय संपादन केला. गेल्या काही वर्षांपासून आमदार होण्याकरिता म्हस्के यांची धडपड सुरू होती. पण, उमेदवारी मिळत नसल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठीही ते प्रयत्नशील होते. त्यातही त्यांना यश आले नव्हते. आमदार होता आले नसले तरी खासदार होण्याचा मान मात्र त्यांना मिळाला आहे. या निवडणुकीत त्यांनी केलेला ‘कार्यकर्ता धनुष्यबाणाचा’ हा प्रचार लक्षवेधी ठरला.

खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या काळापासून ते भारतीय विद्यार्थी सेनेत कार्यरत होते. या संघटनेचे शहरप्रमुख, जिल्हा प्रमुख अशी पदे त्यांनी भुषविली. या संघटनेच्या कार्यातून त्यांनी जिल्ह्यात स्वत:ची ओळख निर्माण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाप्रमुख पद होते, त्या काळात म्हस्के यांचे पक्षातील राजकीय महत्व वाढले. सुरुवातीला ठाणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर २०१२ आणि २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत ठाण्यातील आनंदनगर भागातून म्हस्के मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या काळात महापालिकेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून म्हस्के कार्यरत राहीले.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी गमावली १६.४ कोटींची अनामत रक्कम; सर्वाधिक रक्कम गमावणारे उमेदवार कोणत्या पक्षाचे?

ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. महापौर, सभागृह नेते अशी जबाबदारी पार पाडलेल्या म्हस्के यांची ठाणे महानगरपालिकेचे कारभारी म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्यावर अधिक जबाबदारी आली आहे.